Wednesday 3 February 2016

“मॉल”करी

“मॉल”करी


चातुर्मासात, आषाढी-कार्तिकी एकादशीला भक्त पंढरपूरला जात असत – अजूनही जातात. ही पंढरपूरची वारी, आणि म्हणून, ते वारकरी. हे भक्त विठोबाची माळ आवर्जून गळ्यात घालत, त्यामुळे त्यांना माळकरी असेही म्हणत.

तर आधीच्या काळी असे होते हे माळकरी, आणि आजच्या काळात आहेत “मॉल”करी. त्याच नेमाने आणि तेवढ्याच भक्तिभावाने मॉलच्या वार्‍या करणारे ते मॉलकरी.

महिन्याचे घर-सामान भरायचे आहे – चला मॉलमध्ये; कपडे-भेटवस्तू यांची खरेदी करायची आहे – मॉलमध्ये कुठेतरी सेल असेलच; पिक्चर बघायला जायचे आहे – आहेत ना इतके स्क्रीन्स मॉलमध्येच; कुणाकडून ट्रीट उकळायची आहे किंवा घरात कुणाची अ‍ॅनिव्हर्सरी वगैरे? – मग मॉलमध्ये किती ऑप्शन्स आहेत-फूड कोर्ट तर आहेच शिवाय खास रेस्तराँ पण आहेतच; लहान मुलांना रविवारचं स्पेशल फिरायला न्यायचय – मॉलमध्ये मुलांसाठी किती गेम्स आहेत; नुसताच टाईमपास करायचा आहे – मॉल झिंदाबाद!

‘सर्वकाही एका छताखाली’ उपलब्ध असतांना दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? जसे एखाद्या औषधाची जाहिरात करतात – सर्व आजारदुखण्यांवर एकच रामबाण इलाज! त्याचप्रमाणे – तुम्हाला काहीही करावयाचे असो, गंतव्य स्थान – डेस्टिनेशन – एकच. मॉल!

अगदी फार नाही, काही थोड्याच वर्षांपूर्वी हे दृश्य अगदी वेगळे होते. कार्यक्रम काय आहे यावर जाण्याचे ठिकाण अवलंबून असे. नुसती खरेदी जरी म्हंटली तरी कशाची खरेदी करायची आहे त्याप्रमाणे – कपड्यांची असेल तर एका ठिकाणी, घरच्या वस्तू-तर दुसरीच जागा. शनिवार-रविवार फिरायला जाणे म्हणजे – सहजच जायचे असेल तर जवळपासची एखादी बाग; थोडा खास प्रोग्राम म्हणजे – मुंबईकरांसाठी चौपाटी, शिवाजी पार्क तर उपनगरवासियांसाठी जुहू बीच, अक्सा बीच वगैरे. आता आमच्या शेजारच्या तीन वर्षांच्या चिमुरडीला जरी विचारले, तर पट्कन उत्तर येते – टाईम झोन!

काही खास कारणांनीच मॉलमध्ये जाणे होते असेच जरूरी नाही. सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब घराबाहेर पडायचे असेल तर जायचे एकच ठिकाण! त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवशी, शनिवारी-रविवारी तर हे मॉल्स भरभरून, ओसंडून वाहात असतात.

आता हे मॉलकरी असणं यामध्य काही वावगं आहे असे इथे अजिबात म्हणायचे नाहीये. प्रत्येक काळानुसार बदल होणारच. पूर्वी जे जुहू बीचचे, तिथल्या मोकळ्या वार्‍याचे, भेळपुरी-पाव भाजीचे आकर्षण होते तेच आता मॉल्सच्या नीटनेटक्या, अतिसुंदर वातावरणाचे, तिथल्या आकर्षक प्रेझेन्टेशन्सचे, तिथल्या सुखसोयींचे! हे मात्र अगदी खरे की इतकी नीटनेटकी टापटीप, इतकी स्वच्छता, इतका व्यवस्थितपणा बाहेर कुठेही पाहायला मिळणार नाही.




हे मॉल्स आणि त्यातील चमकदार दुकाने प्रथम आली तेव्हा रीटेल दुकानदारांची धाबी दणाणली. त्यांच्या व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला. पण तीच समस्या आता मॉल्सच्या समोर उभी ठाकली आहे. ऑनलाईन शॉपिंगची इतक्या वेगाने वाढ होत आहे की मॉल्समधली दुकाने आता ओस पडू लागली आहेत. या ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर सेल्स व सवलती खूपच असल्याने, दोन-तीन क्लिक्स करून घर-बसल्या जर स्वस्त्यात वस्तू मिळणार असतील, तर मॉल्सच्या दुकांनांचे भारी दर कोण भरेल? काही जण तर तिथल्या दुकानांत ट्रायल करून आपल्या कपड्यांचे साइझ वगैरे नक्की करतात, मग घरी येऊन ऑनलाईन साइटवरून तेच सर्व अर्ध्या किंमतीत ऑर्डर करतात.

परिणामान्ती जे भराभर शिखर चढून गेले ते त्याच वेगाने खालीही घसरू लागले. आमच्या जवळपासच्या उच्चभ्रू वस्तीतील दोन मोठे मॉल्स संपूर्णतः बंद करण्याची वेळ आली.

काही बाबतीत हे जरी खरे असले तरी नवीन मॉल्स निर्माण होतच आहेत आणि अस्तित्वातील बरेचसे आपल्या रंगीबेरंगी चमचमाटासह जोमाने वाढतही आहेत. ही सारी कृपा मॉलकरी समूहाची. तेव्हा, जय  मॉलकरी!! 


Image courtesy: sftodo.com, 10best.com