Wednesday 16 September 2015

पाण्यावर धावणारी बॅसिलिस्क


पाण्यावर धावणारी बॅसिलिस्क 

आपण बरेचदा असे ऐकतो कि कोणी अमुक साधू-योगी पाण्यावर चालण्याचा विक्रम करून दाखवू शकतो. खरंखोटं त्या पाण्यालाच माहीत. परंतु निसर्गात असा एक प्राणी आहे हो खरोखरच पाण्यावरून धावत जाऊ शकतो -- न बुडता.

त्या प्राण्याचे नाव आहे बॅसिलिस्क किंवा जीसस क्राइस्ट लिझर्ड / येशू ख्रिस्ताची पाल. ही पाल मुख्यत्वे मध्य अमेरिकेच्या जंगलांमध्ये सापडते. तिच्या या पाण्यावर चालण्याच्या क्षमतेमुळे तिला जीसस क्राइस्ट लिझर्ड असे म्हंटले जाते.
अनेक शास्त्रज्ञांनी तिच्या या अद्भुत कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी तिच्या धावण्याचे व्हिडिओज् काढून त्यांचे निरीक्षण केले.

या पाली जास्त करून झाडांवर रहातात, पण सहसा पाण्यापासून फार दूर नसतात. जराही धोक्याची शंका आली तर त्या पाण्यावर उडी घेतात. मग सरळ ताठ उभ्या राहून, मागील दोन पायांवर जवळ जवळ 1.5 मीटर प्रति सेकंद या वेगाने पाण्यावरून धावत जाऊ शकतात.

Green basilisk Lizard Walking on Water Image

या खास क्रियेसाठी निसर्गाने या प्राण्यांना तशीच खास शरीर-रचना दिली आहे. त्यांच्या मागील दोन पायांची बोटे लांब असतात. या बोटांदरम्यान त्वचेच्या झालरी असतात, ज्या पाण्यात पाय टाकल्यावर उलगडतात. बॅसिलिस्क या पावलांचा वल्ह्यासारखा उपयोग करतात. ताणून उघडलेल्या पाठच्या पावलांनी त्या पाण्यावर चापट्या मारतात, ज्यामुळे पाण्यात खळगे तयार होतात. या खळग्यांमध्ये air pockets  किंवा हवेची पोकळी बनते. या हवा भरलेल्या खळग्यांमुळे त्यांचे पाय पाण्यात बुडत नाहीत.
त्यांची चाल अतिशय वेगवान असते त्यामुळे, त्या खळग्यात पुन्हा पाणी भरण्याआधी बॅसिलिस्क आपला पाय त्यातून काढून घेते आणि पुढचे पाऊल टाकते, जिथे पुन्हा खळगा तयार होतो.
याप्रमाणे त्या अतिवेगाने 15 फूट किंवा 4.5 मीटर्स इतके अंतर पाण्यात खाली न पडता जाऊ शकतात. त्यानंतर गुरुत्वाकर्षणाने खेचले गेल्यावर पुढचे पायही पाण्यावर टेकवून चारी पायांनी पोहून जातात. त्या उत्तम पोहू शकतात आणि पाण्याखाली 30 मिनिटेही राहू शकतात. पाण्यावरून धावतांना आपल्या लांब शेपटीने तोल सांभाळतात.
शेपटीसहित बॅसिलिस्कची एकूण लांबी जवळजवळ दोन फूट असते व वजन साधारण 200 ग्रॅम असते. नर बॅसिलिस्कच्या डोक्यावर व पाठीवर उठावदार तुरे असतात. मादी एक छोटा खंदक बनवून त्यात साधारण 20 अंडी एका वेळेस घालते व त्यांना स्वतःच उबण्यासाठी सोडून देते. अंड्यांतून बाहेर येताच पिलांना पाण्यावर धावणे, पोहणे ही कौशल्ये जमतात.
बॅसिलिस्क हे सर्वभक्षक असतात, ते झाडे-पाने,फळे तसेच कीटक वगैरे खातात.

Tuesday 1 September 2015

उडणारा सर्प


उडणारा सर्प 
सर्प उडू शकतो हे खरे वाटणार नाही. परंतु दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये हे प्रत्यक्षात पहावयास मिळते.
या सर्पांचे जातिवाचक नाव क्रायसोपेलिया असे आहे आणि आतापर्यंत त्यांच्या पाच प्रजाती माहीत आहेत. हे सर्प अतिशय सुंदर आणि  अलंकृत असतात. परस्परविरोधी रंगांच्या खवल्यांनी त्यांची त्वचा सुशोभित दिसते.  बहुधा हिरवट रंगांचे असले तरी लाल, काळ्या खुणा किंवा पट्टे ही दिसून येतात. काही सर्पांमध्ये पाकळ्यांच्या आकारात जुळवलेले लाल-पिवळ्या रंगांचे खवले डोक्यावर व शेपटीवर दिसतात.

हे सर्प वृक्षवासी असतात व पोटावरील कंगोर्‍यांसारख्या खवल्यांच्या मदतीने उंच, सरळसोट वृक्षही सहजतेने चढू शकतात. फार क्वचितच हे सर्प जमिनीवर आढळतात, आपल्या उडण्याचा वापर करून एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जातात.

तसे पाहिले तर हे सर्प खरोखरीचे उडू शकत नाहीत, कारण उड्डाणानंतर ते उंची गाठू शकत नाहीत. ते एका ठिकाणाहून दुसर्‍या जागी तरंगत किंवा ग्लाईड करत जातात.


उड्डाणासाठी तयार होतांना, हे सर्प फांदीच्या टोकापर्यंत सरपटत जातात, तेथून इंग्रजी  जे  J  अक्षराप्रमाणे खाली लोंबकळतात. अर्ध्या शरीराच्या सहाय्याने फांदीपासून झटक्याने निघतात आणि लगेच एस्  S  चा आकार बनवितात. हे करतांना, फासळ्या पसरवून व शरीराचा खालील भाग आंत खेचून, त्यांच्या शरीराच्या सर्वसाधारण रुंदीच्या दुप्पट रुंदीइतके शरीराला चपटे करतात. त्यामुळे नेहमीचे नलिकाकृति शरीर  इंग्रजी सी  C  अक्षरासारखे आतून खोलगट किंवा अंतर्वक्र बनते. या खोलगट भागातील हवेमुळे उडण्यास किंवा तरंगण्यास मदत होते आणि खाली येण्याच्या वेगावर नियंत्रण मिळते. शरीराला मागेपुढे लाटेप्रमाणे हेलकावे देऊन त्यास पुढे जाण्यास गति प्राप्त होते.

असे हे उडणारे सर्प भारत, श्री लंका, इंडोनेशिया या देशांत मुख्यत्वे आढळतात. अधिकतः झाडांवरच रहाणारे हे सर्प दोन ते चार फूट लांबीचे असतात. हे अतिशय सौम्य प्रमाणात विषारी असतात. आपल्या उडण्याचा उपयोग ते स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तसेच भक्ष्य पकडण्यासाठी करतात.