Tuesday 1 September 2015

उडणारा सर्प


उडणारा सर्प 
सर्प उडू शकतो हे खरे वाटणार नाही. परंतु दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये हे प्रत्यक्षात पहावयास मिळते.
या सर्पांचे जातिवाचक नाव क्रायसोपेलिया असे आहे आणि आतापर्यंत त्यांच्या पाच प्रजाती माहीत आहेत. हे सर्प अतिशय सुंदर आणि  अलंकृत असतात. परस्परविरोधी रंगांच्या खवल्यांनी त्यांची त्वचा सुशोभित दिसते.  बहुधा हिरवट रंगांचे असले तरी लाल, काळ्या खुणा किंवा पट्टे ही दिसून येतात. काही सर्पांमध्ये पाकळ्यांच्या आकारात जुळवलेले लाल-पिवळ्या रंगांचे खवले डोक्यावर व शेपटीवर दिसतात.

हे सर्प वृक्षवासी असतात व पोटावरील कंगोर्‍यांसारख्या खवल्यांच्या मदतीने उंच, सरळसोट वृक्षही सहजतेने चढू शकतात. फार क्वचितच हे सर्प जमिनीवर आढळतात, आपल्या उडण्याचा वापर करून एका झाडावरून दुसर्‍या झाडावर जातात.

तसे पाहिले तर हे सर्प खरोखरीचे उडू शकत नाहीत, कारण उड्डाणानंतर ते उंची गाठू शकत नाहीत. ते एका ठिकाणाहून दुसर्‍या जागी तरंगत किंवा ग्लाईड करत जातात.


उड्डाणासाठी तयार होतांना, हे सर्प फांदीच्या टोकापर्यंत सरपटत जातात, तेथून इंग्रजी  जे  J  अक्षराप्रमाणे खाली लोंबकळतात. अर्ध्या शरीराच्या सहाय्याने फांदीपासून झटक्याने निघतात आणि लगेच एस्  S  चा आकार बनवितात. हे करतांना, फासळ्या पसरवून व शरीराचा खालील भाग आंत खेचून, त्यांच्या शरीराच्या सर्वसाधारण रुंदीच्या दुप्पट रुंदीइतके शरीराला चपटे करतात. त्यामुळे नेहमीचे नलिकाकृति शरीर  इंग्रजी सी  C  अक्षरासारखे आतून खोलगट किंवा अंतर्वक्र बनते. या खोलगट भागातील हवेमुळे उडण्यास किंवा तरंगण्यास मदत होते आणि खाली येण्याच्या वेगावर नियंत्रण मिळते. शरीराला मागेपुढे लाटेप्रमाणे हेलकावे देऊन त्यास पुढे जाण्यास गति प्राप्त होते.

असे हे उडणारे सर्प भारत, श्री लंका, इंडोनेशिया या देशांत मुख्यत्वे आढळतात. अधिकतः झाडांवरच रहाणारे हे सर्प दोन ते चार फूट लांबीचे असतात. हे अतिशय सौम्य प्रमाणात विषारी असतात. आपल्या उडण्याचा उपयोग ते स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तसेच भक्ष्य पकडण्यासाठी करतात.

No comments:

Post a Comment