Wednesday 21 October 2015

कथा आपट्याच्या पानांची

कथा आपट्याच्या पानांची

विजया दशमीच्या दिवशी आपण आपट्याची पाने वाटतो. ही प्रथा कशी पडली, माहीत आहे? त्यामागे ही एक कारण आहे, एक कथा आहे.



देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा लहान मुलगा होता कौत्स. हा कौत्स विद्यार्जनासाठी ऋषी वरतंतु यांच्या आश्रमात गेला. तेथे त्याने गुरूकडून सर्व विद्या प्राप्त केल्या.  त्यानंतर त्याने गुरूदक्षिणा देण्याची इच्छा व्यक्त केली. ऋषींनी कोणतीही दक्षिणा घेण्यास नकार दिला. परंतु कौत्साने आग्रह धरला कि त्यांना गुरूदक्षिणा घ्यावीच लागेल.
तेव्हा ऋषी वरतंतु म्हणाले कि असे असेल तर, तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येसाठी एक या प्रमाणे चौदा विद्यांसाठी एकूण चौदा कोटी सुवर्ण मुद्रिका मला दे. 
कौत्स त्यासाठी राजा रघु याच्याकडे गेला. राजा रघु हा श्री रामाचा पूर्वज होता व आपल्या दानशूरतेसाठी खूप प्रसिध्द होता. राजाने कौत्साचे मागणे ऐकले परंतु राजाने तेव्हा नुकताच विश्वजित यज्ञ संपन्न केला होता व त्या यज्ञामध्ये राजा रघुने आपली सारी संपत्ती ब्राह्मणांना दान केली होती. त्यामुळे कौत्साला देण्यासाठी त्याच्याकडे काहीही नव्हते.
तेव्हा राजा रघु देवाधिपति इंद्राकडे गेला व सुवर्ण मुद्रिकांची मागणी केली. इंद्राने कुबेराला बोलाविले व त्याला, राजा रघुच्या अयोध्या नगरीतील सार्‍या आपट्याच्या झाडांवर सुवर्ण मुद्रिकांचा वर्षाव करण्याची आज्ञा केली. कुबेराने त्याप्रमाणे मुद्रिकांचा वर्षाव केला. राजा रघुने मग त्या सर्व सुवर्ण मुद्रिका कौत्साला दिल्या व कौत्साने त्या नेऊन ऋषी वरतंतु यांस अर्पण केल्या. ऋषींनी त्यातून फक्त चौदा कोटी मुद्रिका घेतल्या. कौत्साने राजा रघुकडे जाऊन बाकीच्या मुद्रिका परत घेण्याची विनंती केली.
परंतु राजा रघुने त्या मुद्रिका परत घेण्यास नकार दिला, कारण त्याने त्या सर्व दान म्हणून दिल्या होत्या. मग कौत्साने त्या सुवर्ण मुद्रिका अयोध्या नगरीतील नागरिकांमध्ये वाटून दिल्या.
तो दिवस होता आश्विन शुक्ल दशमीचा. या घटनेची आठवण म्हणून त्याच दिवशी, म्हणजेच दसर्‍याला, आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून देण्या-घेण्याची ही प्रथा सुरू झाली.

Image Courtesy: Flickr.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment