Friday 20 November 2015

अशीही दिवाळी .....

अशीही दिवाळी .......


नुकतीच दिवाळी होऊन गेली. या वर्षी दिवाळीचा एक आगळाच अनुभव पाहायला मिळाला.



हे खरं ही वाटणार नाही कि दिवाळीच्या दिवसात आभाळाचे रंगरुप हे असे होते! माझाही विश्वासच बसत नव्हता कि ऐन दिवाळीत एवढा पाऊस कोसळू शकतो.

दर वर्षी ह्या दिव्यांच्या उत्सवादरम्यान घरीच असतो. परंतु या खेपेस त्या वेळी बंगलोरला होतो. तेथे पोहोचलो तेव्हापासून वातावरण पावसाळी होते.  मुख्य सणाच्या दिवसांपर्यंत वातावरण सुधारेल अशी सर्वांनाच आशा होती. पण पावसाची लक्षणं वाढतच गेली. धनत्रयोदशीपासून पावसाची जी सुरूवात झाली ती दिवाळीभर चालूच राहिली.

दिवाळीदरम्यान पावसाची एखादी हलकीशी सर येेऊन जाणे हे काही अगदीच अशक्य नाही .....कधीकधी होतेही. पण असा अखंड पाऊस मात्र कधी पाहिला नव्हता. जणुकाही हा नोव्हेंबर महिना नव्हताच, जुलै महिन्यासारखीच संततधार लागली होती.

जोरदार वर्षावृष्टीबरोबरच पावसाळ्याचे बाकी सारे अडथळेही आलेच -- खंडित वीजपुरवठा, चिखल, रस्त्यावरचे खड्डे नि त्यात साचलेले पाणी, ट्रॅफिक जॅम ....
स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगांचे आणि त्यांच्या लाल लाल चमकणार्‍या टेल लाईट्सचे फोटो दिले होते. अंधारात चमकणार्‍या त्या लाल दिव्यांमुळे असे भासत होते जणू त्या मोटर कार्स ट्रॅफिक जॅममध्येही दिव्यांचा उत्सव रोषणाईने साजरा करत होत्या.

                                           Image Courtesy: The Times Of India - Bangalore.

लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळपर्यंत पाऊस कमी कमी होत थांबला ......दुसर्‍या दिवशी पुन्हा सुरू झालाच, पण निदान संध्याकाळच्या पूजेच्यावेळी सर्व काही ठीक होते. त्याचा फायदा घेऊन लगेच सर्वत्र दिवाळीची आणि पूजेची एकच गडबड सुरू झाली. फटाक्याच्या आतिषबाजीने अंधारलेले आकाश क्षणातच उजळून निघाले.

तिथलेच काही रहिवासी म्हणाले कि दीपावलीच्या वेळी पाऊस पडणे ही बंगलोरमध्ये नित्याचीच बाब आहे, तर काहींचे म्हणणे होते कि वातावरणातील अचानक फेरबदलामुळे या वर्षीच असा धो धो पाऊस पडला. कारण काहीही असो, अनुभव मात्र आगळा होता आणि त्याचा आनंदही घेतला.

आनंदाचं दुसरं .... आणि मुख्य कारण म्हणजे, जवळ जवळ आठ-नऊ वर्षांनी फॅमिलीचे सर्वजण दिवाळीच्या वेळी एकत्र होतो, सर्व मिळून उत्सव साजरा करत होतो


काही वर्षांपूर्वी काळ होता एकत्र कुटुंबांचा, त्यानंतर आली विभक्त कुटुंबे किंवा न्युक्लिअर फॅमिलीज्. आणि आताचा समय आहे विखुरलेल्या कुटुंबांचा. आजकाल शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा अशाच काही कारणांमुळे कुटुंबाचे सदस्य देशाच्याच नव्हे, तर विश्वाच्या विविध कानाकोपर्‍यात विखुरलेले असतात. मग कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे सणासुदीच्या वेळी एकत्र जमणे शक्य होत नाही. गणपती, दसरा-दिवाळी येतात आणि जातात, प्रत्येकजण दुनियेच्या आपापल्या कोपर्‍यात आपापल्या परीने साजरे करतात.
त्यामुळे जेव्हा सर्वच एकाठिकाणी असतात आणि तेही वर्षाच्य मोठ्या दीपोत्सवाच्या वेळी, तेव्हा तर ....सोनेपे सुहागा!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------




No comments:

Post a Comment