Sunday 22 November 2015

धुमसणारे पर्वत


कॅनडाच्या उत्तरेतील थंड प्रदेशात एक दुर्मिळ आणि अपूर्व गोष्ट पहावयास मिळते ..... धुमसणारे पर्वत!

आर्क्टिक समुद्राजवळ, कॅनडाच्या उत्तरी तटावर ही अभूतपूर्व गोष्ट दिसून येते.
ब्लूफोर्ट समुद्राच्या दक्षिणेस एक किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्र-भागास आता फ्रॅँकलिन बे या नावाने ओळखले जाते. या मागेही एक छोटीशी गोष्ट आहे. सर जॅान फ्रॅँकलिन यांची संशोधन मोहीम याच प्रदेशात बेपत्ता झाली होती. 1850 मध्ये ब्रिटीश नेव्ही कॅप्टन रॅाबर्ट मॅक्लूअर यांना त्यांच्या शोधार्थ पाठविले गेले. ब्लू फोर्ट समुद्र क्षेत्रात त्यांच्या शोध गटाला धूर निघतांना दिसला, ज्याला ते सर्व फ्रॅँकलिनच्या छावणीतून निघणारा धूर समजले. जवळून प्रत्यक्षात पहाता त्यांच्या लक्षात आले कि तो धूर समुद्र तटावरील पर्वतांतून निघत होता. त्या समुद्र भागास फ्रॅँकलिन बे हे नाव पडले.





File:Smoking Hills AXW 0131.jpg





 या स्मोकिंग हिल्स किंवा धुमसणार्‍या पर्वत कड्यांवर लिग्नाईट म्हणजेच तपकिरी काळ्या रंगाच्या दगडी कोळश्याचे प्रचंड साठे पसरलेले आहेत. या मध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असलेले पातळ थरांचे खडक आणि सल्फर  असलेले पायराईट नावाचे चकचकीत पिवळे खनिज असते. या रासायनिक संयुगांस हवा लागताच ते पेट घेतात व धूर निर्माण होतो. या धूरामध्ये सल्फर डाय ऑक्साइडचे प्रमाण अधिक असते त्यामुळे वातावरणात सतत एक विशिष्ट गंध पसरलेला असतो, तसेच या वायूमुळे जवळपासच्या सरोवरांचे पाणी आम्लयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

कॅनडाचा हा प्रदेश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ असल्याने येथे कमालीची थंडी असते. अश्या या अतिशीत प्रदेशातही हे पर्वत कडे अनादि काळापासून धुमसत आले आहेत आणि वर्षानुवर्षे ते तसेच राहतील. ही निसर्गाची किमयाच नाही का?

Image Courtesy: commons.wikimeidia.org.

No comments:

Post a Comment