Thursday 19 January 2017

कळा अंतरीच्या .....

कळा अंतरीच्या....

झोपायला तसा उशीरच झाला होता,आणि नेमके तेव्हाच  रस्त्यावर कुणा कुत्र्याने भुंकायला सुरूवात केली. दोनदा भुंकेल, तीनदा भुंकेल आणि मग थांबेल असच वाटलं.पण नाही, त्याचं भुंकणं चालूच राहीलं, अगदी जोरजोरात. आवाज वाढतच गेला. दमून झोपायच्याच वेळेलाअसा आवाज म्हणजे.... पण त्रास काही मला एकटीलाच होत नसावा. सगळ्यांच्याच गाढ झोपेची वेळ ती. म्हणजे सगळेच त्रस्त झालेच असणार.

पण का भुंकत होता तो ....इतक्या सातत्याने अन् इतक्या जोरात. काहीतरी कारण असणारच ना. जनावर झालं म्हणजे काही वेडा नव्हता ना तो कुत्रा. काही लागलं असेल, दुखलं-खुपलं असेल, कशाची तरी भीती वाटली असेल नाहीतर कुणीतरी जाता जाता उगाच मस्ती म्हणून दगड फेकून मारला असेल. कदाचित तो आपल्या राखणदाराच्या कर्तव्याला जागून भुंकत असेल...रस्त्यात कुणी संशयास्पद माणूस दिसल्याने आवाज देऊन इतरांना तो सतर्क करत असेल, माणसाची उलट मदतच करत असेल.

परंतु ऐकणार्‍्यांना,आजूबाजूच्यांना मात्र त्याचा त्रासच होत होता
माणसांचं देखील असंच काहीसं असतं, नाही का?
कुणी आपलं दुःख उघड केलं, आपलं मन मोकळं केलं तर तेवढ्यापुरतं समजूतीने, सांत्वनपर बोलतील. पण तेच जर का पुन्हा पुन्हा होतं राहीलं, तर मात्र ऐकणाराही चक्क कंटाळतोच. 
अगदी मैत्रिणी-मैत्रिणींच्या घोळक्यात जरी कुणी आपलं मन हलकं करण्यासाठी मनाची, आयुष्यालाच झालेली जखम उघडी केली तर ....दोनदा, चारदा ऐकून घेतात, पण मग? आपलं दुःख आपल्याकडेच ठेवावं, दुसर्‍यांना त्यात इंटरेस्ट नसतो हे बोलून दाखवतातच. अगदी इतक्या स्पष्ट शब्दात नाही, तरी ही समोरच्या व्यक्तीला साफ कळेल अश्याच प्रकारे बोलून दाखवतातच.
आता, दुःख सांगणारणीला आपले रडगाणं गायला खुशी होते म्हणून तर ती सांगत नसते ना? ती ही अतिशय़ कष्ट होतात, मनातल्या गोष्टी मनात दाबून ठेवणं अशक्य होतं, तेव्हाच तोंड उघडून बोलते ना? पण तरी ही ऐकणार्‍यांना फक्त त्रासच होतो. तिच्या जीवाचा तळतळाट नाही समजू शकत.
म्हणूनच तर म्हणतात ना --
ज्याचं जळतं त्यालाच कळतं!

No comments:

Post a Comment