Monday 30 January 2017

प्रथा अन् व्यथा

   

प्रथा अन् व्यथा

नुकताच संक्रांतीचा सण होऊन गेला. मकर संक्रांतीचा सण म्हणजे तिळगुळ, हळदीकुंकू, सुवासिनींना वाण ---- ह्याच गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्या अनुषंगाने काही विचार मनात आले ……

Image result for pictures of haldi kumkum
इयत्ता दहावीच्या मराठी वाचनपाठामध्ये (ज्यांची दवितीय भाषा मराठी, म्हणजेच इंग्लिश मिडीयम साठी) प्रसिद्ध लेखिका व संपादिका विद्या बाळ यांचा एक पाठ आहे, 'ऋतुबदलाचे उत्सव'. यामध्ये लेखिकेने अतिशय उत्तम विचार मांडले आहेत कि बदलत्या काळानुसार आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरा यातही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी कामानिमित्ताने हा पाठ वा लेख नजरेखालून गेला. तेव्हा त्याकडे काही विशेष ध्यान दिले गेले नाही. हो, खरं आहे, चांगले विचार आहेत; इतकेच मनात आले. पण या पिढ्या न् पिढ्या चालत असलेल्या परंपरा आहेत, यात थोडीच काही बदल होणार आहे? अशी ही शंका कुठेतरी मनात डोकावून गेली. त्यानंतर हे सारे विचार विसरूनही गेले होते.

आता नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. फार वर्षांपूर्वीचे तुटलेले लागेबांधे, मैत्रीसंबंध दूरून का होईना पण पुन्हा संपर्कात येत आहेत. अशाच जुन्या मैत्रिणींच्या ग्रुपमधून बरच काही ऐकायला, आणि त्यातूनच शिकायलाही मिळते. सरत्या काळासमवेत आयुष्यात खूप काही बदल होत राहतात, सर्व काही 'आणि ते सुखाने नांदू लागले' असेच राहते असे नाही. काहींचे जन्माचे जोडीदार कायमचे दूर निघून गेलेले तर काहींचे याच भूतलावर असूनही सोबत न राहिलेले.

एरवी मैत्रिणी-मैत्रिणी मिळून लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत असतांना आपापसांत कुठलाच फरक राहात नाही. परंतु अशा सणा-समारंभाच्या निमित्ताने जेव्हा विषय निघतात आणि या आपल्यातल्याच सख्या जेव्हा काही वेगळे अनुभव सांगू लागतात तेव्हा काहीश्या धक्क्यानेच जाणीव होते की आतापर्यंत ज्या प्रथा परंपरा आपण गृहीत धरून आपण पुढे चालवत आलो, त्यांच्या कडे एका नवीन नजरेने पाहण्याची आवश्यकता आहे, नाही का?

जेव्हा विद्या बाळ यांचा लेख वाचला तेव्हा काही विशेष जाणवले नव्हते. लेखामध्ये त्यांनी हेच तर प्रतिपादन केले होते – नवरा असलेल्या – नसलेल्या, मूल असलेल्या – नसलेल्या, विशिष्ट धर्माच्या किंवा आपल्याच जातीच्या स्त्रिया, असा कोणत्याही प्रकारचा मनाचा संकुचितपणा किंवा भेदभाव न ठेवता केवळ सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे सर्व सण-समारंभ आनंदाने साजरे करावे. पण हे बदल तितके सोपे आहेत का? समाज बदलासाठी तयार आहे का? जेव्हा हेच सगळं केवळ एक लेख म्हणून वाचलं होतं तेव्हा काही विशेष वाटलं नव्हतं. पण हेच प्रसंग जेव्हा आपल्या जवळच्या कोणावर आले तर लगेच वाटू लागलं, खरं आहे, हे बदल व्हायलाच पाहिजे, जुन्या रूढींचे केवळ आंधळेपणाने अनुसरण होऊ नये. किती स्वार्थी असतं ना आपलं मन? जेव्हा आपल्या कोणावर पाळी येते तेव्हा लगेच पटतं……

ग्रुपमधल्या काही जणींनी हेच सांगितले कि जेव्हा त्या स्वतः हळदीकुंकू समारंभ करत असत तेव्हा ऑफिसातील, ट्रेनमधील, सोसायटीतील एकजात सर्वच स्त्रियांना बोलावून तिळगूळ, वाण वगैरे देत असत. एवढेच नव्हे तर आपल्या बरोबरीच्या इतर स्त्रियांनाही असेच करण्यासाठी प्रोत्साहन देत असत. पण जेव्हा त्यांची स्थिती (स्टेटस) सौभाग्यवती वरून श्रीमती मध्ये बदलली तेव्हा त्याचबरोबर त्यांच्यासमवेतची वागणूकही बदलली. एकूण काही फारसे चांगले अनुभव नसावेत हे तर त्यांच्या बोलण्यावरून स्पष्टच होते. काळाबरोबर बदललेल्या या 'सो कॉल्ड आधुनिक' समाजातही पूर्वीचे सारे रीतिरीवाज तसेच चालू राहावेत, हे योग्य आहे का – हा एक मोठाच प्रश्न आहे.

हेच आपले बरे-वाईट अनुभव सांगणार्‍्या मैत्रिणीने अजूनही एक गोष्ट आवर्जून सांगितली. या संक्रांतीत काही उपदेश न करता, काही न सांगता, एका तरूण मुलीने, जी तिची लांबची नातेवाईक होती, स्वतःहून आमच्या या मैत्रिणीला हळदीकुंकवाचे वाण दिले.  ही प्रथम भांबावली, मग तिला गहिवरून आले. काही न शिकवताही आताची नवी पिढी स्वतःहून पुढाकार घेत आहे; घोषणा नारेबाजी नसेल पण बदलाची पावले मात्र नक्कीच उचलत आहे. मग खात्रीने आशा आहे एका नव्या उद्याची!

इमेज : फ्लिकर 

No comments:

Post a Comment