Friday 10 February 2017

हे खरंच जरूरी आहे का?

हे खरंच जरूरी आहे का?

परवाच इथल्या बंगलोरच्या वर्तमानपत्रात एक बातमी वजा लेख वाचला – ब्रायडल ड्रेस म्हणजेच वधूच्या लग्नातील पोषाखाविषयी. वाचून मनात बरेच विचार उठले –

आता डिमॉनेटायझेसन नंतर पैशाच्या बर्‍्याचश्या व्यवहारांवर नियम लागू करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तीन लाखांवरील एकरकमी खरेदीवर अटी / कायदे लागू. आणि त्यामुळे ड्रेस डिझायनर्सच्या व्यवसायावर गदा आली. कारण काय तर सध्याचे ब्रायडल ड्रेसेस हे एकेक सात आठ लाख किंवा त्यावरच असतात.


वधूने एका दिवसासाठी, खरं तर केवळ काही तासांसाठी घालायच्या कपड्यांची किंमत सात आठ लाख? आणि असे हे कपडे नियमितपणे, ऑन रेग्युलर बेसिस, खरेदी केले जातात? ही कल्पनाही अतिशय अश्लिल / बीभित्स व्हल्गर वाटते.

मला अतिशय मागासलेली किंवा पुराण कालातील समजले जाईल. परंतु मी अश्या खर्चाची कल्पनाच करू शकत नाही. आणि हा प्रश्न माझ्या विचारांचा नाही आहे. मुळात हा असा अवास्तव खर्च खरोखरच जरूरी आहे का?

एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय घरातील मुलीच्या संपूर्ण लग्नाचा खर्च त्या एका ड्रेसच्या खर्चात होऊन जाईल. तसं पाहायला गेले तर त्या एका ड्रेसच्या पैशात किती तरी गरजेच्या गोष्टी होऊ शकतील – एखाद्या नडलेल्या गरीबाचं जीव वाचवणारं ऑप्रेशन होऊ शकेल, दूर खेडेगावात एखादी लहानशी शाळा सुरू करता येईल ज्यामुळे बरीच मुले शिकून साक्षर होऊ शकतील, उपाशी गोरगरीबांना जर अन्न दिले तर त्या तेवढ्या लाखांमध्ये किती भुकेल्यांची पोटे भरतील सांगा बरं? अनाथालयांना देणगी देता येईल, इस्पितळाच्या बालरुग्ण विभागामध्ये सुधारणा-मदत करता येईल….. पर्याय, गरजा असंख्य आहेत. आपला देश व परस्थिती अशी आहे कि जितकं करावं तितकं थोडंच.

मग अशी परिस्थिती असतांना काही तासांसाठी इतका खर्च करणं हे योग्य आहे का? जी वधु तो पोषाख घालणार तिच्याही मनात एकदाही हा विचार येतच नाही का कि केवळ माझ्या हौसे साठी मी लाखो रूपये खर्च करणार तेच कुणा गरजवंताच्या कामी येऊ शकतात …..आणि कितीही म्हंटले तरी असे भारी कपडे पुन्हा वापरणे कठीणच असते. फार तर फार अगदी घरातल्या लग्नांमध्ये घातले जातील, पण त्यासाठीही सख्खी भावंडे जेमतेम एक किंवा दोन. त्यावेळीही तो लग्नातला ड्रेस घातला जाईलच असे नाही. म्हणजे पडूनच राहणार? तेवढ्यासाठी इतका खर्च?

आपली मानव जात इतकी का स्वार्थी होत चालली आहे, कि स्वतःच्या हौशीमौजीपुढे काहीच सुचत नाही? विचारांचं जराही तारतम्य राहात नाही? खर्च करणार्‍्यांचं यावर एकच उत्तर असतं – लग्न आयुष्यात एकदाच होतं (तसं पाहिलं तर हे ही आता तितकंसं खरं नाही) मग लग्नात नाही तर केव्हा करणार हौस? करावी हौस, पण त्यावरही काही स्व-विचारांनी घातलेल्या मर्यादा नको का? इतक्या पैशांचा चुराडा ….. त्याऐवजी तेच पैसे जर कुणा गरजूंना दिले तर आयुष्यभरासाठी त्यांचे आशीर्वाद नाही का मिळणार?

पण असे हे विचार कुणाला रूचणार? कुणी ऐकायलाही तयार होणार नाही. सर्व जगच धावतयं पैशांच्या पाठी, बरं-वाईट, योग्य-अयोग्य कोण पाहात बसलंय? आजकाल या 'मी'ला फार महत्त्व आले आहे, आपल्याला काय हवे ते करावे, दुसरे गेले उडत. यालाच पूर्वी स्वार्थीपणा म्हणत; आता अ‍ॅटिट्यूड म्हणतात – अन् तो तर अति आवश्यक!



(त्या डिझायनर ड्रेस वाल्यांनी आपल्या व्यवसायासाठी व्यवस्थित पळवाट शोधून काढली – एकाच ड्रेसला तीन वेगवेगळ्या भागात बिभागून तीन वेगळी बिल्स करायची. म्हणजे लेहेंग्याचे तीन लाख, ब्लाउझचे अडीच आणि ओढणीचे अडीच लाख. म्हणजे सर्व बिल्स ही तीन लाखांच्या खालीच आणि पूर्ण पोषाखाचे संपूर्ण पैसेही वसूल. व्वा! याला म्हणतात धंदा!)

No comments:

Post a Comment