Friday 24 February 2017

आधुनिक युगाचे वायरमन

आधुनिक युगाचे वायरमन

जसजसे दिवस पालटतात, तश्या किती तरी गोष्टी बदलत जातात, नाही का? आता प्रवासाचीच गोष्ट घ्या ना.

पूर्वौ प्रवासाला निघायचे म्हणजे सर्वप्रथम होल्डॉल बाहेर काढून, साफसूफ करून बांधायच्या तयारीला लागायचे. आताच्या मुलांना तर प्रश्न पडेल, (' दारू म्हणजे रे काय, भाऊ' च्या चालीवर) 'होल्डॉल म्हणजे रे काय, ब्रो?' त्यांना तो बहुधा पुराण वस्तूसंग्रहालयात (आता ही आणखी कुठली वा कोणत्या ग्रहावरची जागा?) जाऊन पाहायला लागेल. त्या एका बोजड दिसणार्‍्या वस्तूच्या पोटात काय काय मावत असे -– झोपण्यासाठी अंथरायच्या–पांघरायच्या चादरींपासून ते बारीक सारीक कपडे, टॉवेल्स किंवा अगदी फणी-कंगवेसुध्दा.


साबणाची डबी, टॉवेल, टूथब्रश-पेस्ट अश्या गोष्टी आठवणीने सुटकेसमध्ये ठेवाव्या लागत. …..आता त्यांची गरजच नसते. बहुतेक सर्वच हॉटेल्समधून तुम्हाला या गोष्टी आधीच पुरवल्या जातात – अगदी केसांचा शँम्पू, बॉडी लोशन्ससुध्दा. म्हणजे प्रवासाची बांधाबांध सोपी झाली, नाही का?

पण तसंच काही नाही, हं. ज्याप्रमाणे बर्‍्याचश्या गोष्टी सोबत नेण्याची गरज उरली नाही, त्याचप्रमाणे दुसर्‍्या बर्‍्याचश्या गोष्टी आठवणीने नेण्याची आवश्यकताही निर्माण झाली आहे.


आता स्मार्टफोन तर सततच हाताला (किंवा कानाला) चिकटलेलाच असतो, तेव्हा तो सोबत न्यायलाच हवा. आजकाल बर्‍्याच जणांचा प्रवास हा ऑफिसच्या कामानिमित्ताने असतो. आणि अगदी जरी 'केवळ पर्यटना'साठी घराबाहेर पडले, तरीही ऑफिसचे काही ना काही काम शेपटीसारखे पाठीमागून आपल्याला चिकटून येतच असते. म्हणजे त्यासाठी लॅपटॉप सोबत नेणे आलेच. (कारण, फोन कितीही 'स्मार्ट' असले तरी सारी ऑफिसची कामे त्यावर होणे शक्य नसते).

मग हे स्मार्ट फोन्स, लॅपटॉप्स हवे, तर त्यांच्या चार्जर वायर्सही सोबत हव्याच. फोन्ससाठी बहुधा कोणत्याही अन्य स्मार्टफोनचा चार्जर चालू शकतो. पण आपण हा चान्स घेऊ शकत नाही ना; समजा वेळेवर कुणाचा नाही मिळाला चार्जर किंवा हॉटेलने पुरविलेला नाही फिट् झाला, मग? आली का पंचाईत? त्यापेक्षा आपलाच फोन चार्जर न्यावा हे बरे. त्याशिवाय, फोनवर 'म्यूझिक' ऐकणे हे तर अत्यावश्यक. मग त्यासाठी इयरफोन्स नकोत का? अजून एक वायर.

लॅपटॉपसाठी मात्र चार्जर जरूरच आहे; मला वाटतं प्रत्येक कंपनीचे चार्जर्स वेगवेगळे असतात. म्हणजे ते एक अजून अवजड वायरचे भेंडोळे. त्यात पुन्हा, गणपतीबाप्पांचे जसे त्यांच्या उंदराविना चालत नाही, तसेच जर तुम्हालाही लॅपटॉपसाठी उंदीरमामाची (माऊस) गरज पडत असेल तर तो मूषक आणि त्याचबरोबर त्याची लांब शेपूट! आता वायरलेस उंदीरही मिळतात म्हणा, पण निदान ते एक उपकरण तरी वाढलेच ना!

तशात अलिकडे लहान-थोर सर्वांना वेळ घालविण्याचे साधन म्हणून (किंवा कधी कामासाठीही) टॅब्लेट लागतातच. लहान मुलांच्या हातात गोष्टींच्या पुस्तकांऐवजी गेम्स खेळण्यासाठी टॅब्लेट्स दिले असतात. मग त्यासोबतही त्याची आयुधं लागणारच. त्यात पुन्हा तुम्ही जिथे जाणार तिथे वायफाय असेलच अशी खात्री नसेल, तर – इंटरनेटसाठी डोंगल सुध्दा हवाच ना!

म्हणजे बाहेरगावी निघतांना सामानात ही सारी उपकरणे आणि त्यांच्या विविध वायर्स यांनीच सुटकेस भरते की! आणि प्रश्न फक्त वायर्सचा नाही. एकवेळ दुसरे काही राहून गेले तरी चालेल, पण यापैकी एकही वायर सोबर घ्यायची राहिली तर ते उपकरणच निकामी. आता यापैकी कोणतेही एक उपकरण / आयुध जरी वापरता येऊ शकले नाही, तर? अकल्पनीयच!

आता आपले आयुष्यच इतके या आयुधांवर अवलंबून असते कि – यांच्याशिवाय करणार काय? आताच्या पिढीला केवळ हा विचारही अस्वस्थ करेल. तर अश्या ह्या आमच्या अत्यावश्यक वायर्स आणि असे हे आपण आजच्या युगाचे वायरमन्स!

Image Source: Clipart.

No comments:

Post a Comment