Thursday 23 March 2017

माझे लेखन……

माझे लेखन……

23 मार्च 2017
आत्ता या क्षणी, मला असे वाटते कि माझे लिखाण, विशेषतः ब्लॉग लेखन हे एका दो-रस्त्यावर येऊन ठेपले आहे, अडकले आहे. कुठला रस्ता निवडावा हे कळत नाही आहे.

माझ्या पध्दतीचे लिखाण म्हणजे साधं सुधं, एकतर माझ्या पूर्वानुभवांविषयी किंवा सद्य स्थितीविषयी काही अचानक सुचले किंवा त्या विषयाचा माझ्याशी काही संबंध असला तर त्याविषयी. पण माझा ब्लॉग्जविषयीचा अभ्यास सांगतो कि या प्रकारच्या लिखाणाला ग्राहक नाही. कोणाला त्यात इंटरेस्ट नाही, कोणी तिथे पाहातही नाही. प्रवास, फॅशन, फोटोग्राफी, हाय फाय या विषयीचे ब्लॉग्ज अतिशय डिमांडमध्ये असतात. ते तर आपण लिहू शकत नाही.

दुसरी नवीन ट्रेंड आली आहे ती सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर काही (खर तर, काहीही) लिहायचे. सगळ्यात गरमागरम टॉपिक्स म्हणजे स्त्री-मुक्ती, स्त्री-शक्ती, स्त्रीवर अत्याचार, स्त्री विषयी लिंगभेदाची वागणूक वगैरे वगैरे वगैरे……… कुठलीही बातमी घ्या, तिला मोडून तोडून, कसंही करून या मधील एका टॉपिकमध्ये फिट्ट् बसवा आणि पेश करा. झाली एक गरम, ताजी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अगदी पॉप्युलर पोस्ट, तयार.

माझ्या साध्यासुध्या पोस्ट्स ना कोणी विचारत नाही, तेव्हा असा विचार केला कि जे डिमांडमध्ये आहे ते लिहून पाहावे. प्रथम तसे लिहिणे जमते का हेच पाहायला हवे. म्हणून प्रयत्न केला. केवळ एकच नव्हे तर तश्या धर्तीवर तीन-चार पोस्ट्स लिहून तयार केल्या. ठीकठाक जमल्या असे वाटले. अर्थात माझे स्वतःचे लिखाण मला ठीक वाटणारच. त्यापैकी एक पोस्ट केली.

मी सहसा स्वतःहून विचारायला जात नाही, पण मुलाने स्वतःच पोस्ट वाचल्याचे सांगितले तेव्हा विचारले कि या प्रकारचे लेखन कमर्शियल, म्हणजे केवळ अधिक पॉप्युलॅरिटीसाठी लिहिले असे वाटते का? त्याने उत्तर दिले कि अगदी तसेच नाही, पण थोडे कमर्शियल वाटते. त्याने अडखळत कबूल केले म्हणजे तसे कमर्शियलच वाटत असणार. मग तसे लिहिण्यामागचे माझे कारण सांगितले कि साध्या पोस्ट्स कोणी वाचत नाही.

त्यावर त्याने विचारले, तू स्वतःसाठी लिहितेस का इतरांसाठी? आपल्याला जसे आवडते, लिहावेसे वाटते तसेच लिहावे, दुसर्‍्यांची वाहवा मिळवण्यासाठी का धडपड करावी? मला कोणी काही म्हंटले कि लगेच पटते, तसेच हेही बरोबरच वाटले. स्वतःला हवे तसेच लिहावे नि लिहिण्याचा आनंद घ्यावा.

पण ह्यामध्ये दुसराही मुद्दा आहे. शेवटी कोणीही लिखाण करतात ते दुसर्‍्यांनी वाचावे यासाठी. जर कोणी वाचलेच नाही तर माझे लिखाण माझ्यापुरतेच राहील. तसेही मी जे काही लिहिते ते सर्वांपर्यंत पोहोचावे कि नाही हे अगोदरच माझ्या हाती नाही. अजूनही सर्वांपर्यंत पोहोचत नसावे, पण तो प्रश्न वेगळाच आहे.

मी अगदी नेमाने सर्वांना लाईक करते, व्होट करते. जे कोणीही मला व्होट करतील त्यांना पुढेही व्होट करतच राहाते. पण मला परतून तितकाच प्रतिसाद काही मिळत नाही. खरं तर याला कितपत अर्थ आहे, मी लाईक केल्यानंतर समोरच्याने लाईक करायचं – केवळ कर्टसी म्हणून. खरोखर कोणी वाचतात की नाही, हे कसं कळणार? व्होट चं ही तसंच, मी व्होट करेन तरच व्होट मिळणार, बरेच वेळा तर ते ही नाही.

याला लेखन म्हणायचं? काय किंमत / व्हॅल्यू आहे अश्या लिखाणाची? काही जणं, जो मिळेल त्या सर्व ब्लॉग्जना लाईक / व्होट / कमेंट करतात, त्यांना प्रतिसाद म्हणून तितक्या सर्वाकडून लाईक्स / व्होट्स मिळत जातात आणि त्यांच्या पोस्ट्स टॉप पोस्ट्स – काही काहींच्या पोस्ट्स तर अगदी चक्क भिकार असतात. तरीही टॉप ! तर अश्या या टॉप पोझीशन साठी आपण मारामारी, धडपड करायची? जे विकतं तेच लिहायचं?


तेव्हा प्रश्न फक्त हाच आहे कि लिहायचं तर काय लिहायचं? आणि त्या टॉप च्या जागेसाठी धडपड करायची का नाही? आपल्या मनासारखं लिहायचं आणि त्यातच खुशी मानायची? का सर्व लोकं जसं लिहितात आणि जे हॉट टॉपिक समजलं जातं ते लिहायचं? टॉपला पोहोचणार्‍्या काही पोस्ट्स पाहून तर या टॉप पोझीशनला काही अर्थही आहे का असाच प्रश्न पडतो. मग का करायचा आटापिटा? काहीच कळेनासं होतं. याला लेखन म्हणायचं का व्यापार – देवाणघेवाण? मी लिहायचं काय नि करायचं काय? सगळ्याच गोष्टींची दुविधा – Dilemma. 

No comments:

Post a Comment