Friday 28 August 2015

मध मुंग्या

मानवाने आपल्या बुध्दिमत्तेने किती तरी अनोख्या, अद्भुत गोष्टी बनविल्या आहेत आणि अजूनही नवनवीन वस्तू बनवितच आहे ज्या पाहून अचंबित व्हायला होते.
असे असले तरीही, निसर्गाच्या किमयेला तोड नाही. संपूर्ण सृष्टीमध्ये अश्या असंख्य थक्क करणार्‍या गोष्टी पहावयास मिळतात. त्यातील काहींबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा हा एक प्रयत्न .......

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मध-मुंग्या ( Honey Ants)
आपल्या सर्वांनाच मधमाश्या माहीत आहेत. परंतु कधी मध-मुंग्यांबद्दल ऐकले आहे? मधमाश्या किंवा इतर कीटक निसर्गातून गोळा केलेला मध आपल्या पोळ्यांमध्ये किंवा घरांमध्ये साठवितात. मात्र या मध-मुंग्या जमा केलेल्या मधाची साठवण आपल्या शरीरातच करतात.
मध-मुंग्यांच्या एकूण 34 प्रजाती अस्तित्वात आहेत. या उष्ण, कोरड्या प्रदेशात, वाळवंटांच्या बाहेरील कडांवर रहातात. पश्चिम अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यू गुनिया या भागांत मध-मुंग्या आढळतात.
त्यांच्यातील ज्या कामकरी मुंग्या असतात त्यांच्या आकारात आणि रंगात विविधता दिसून येते. कामकरी मुंग्यांतील ज्यांना रिप्लीट्स या नावाने ओळखले जाते, त्या आकाराने मोठ्या असतात. पावसाळी हंगामात या रिप्लीट्स ना खूप प्रमाणात वाळवंटी फुलांचा मधुर, गोड मध खायला दिला जातो. या मधाने त्या रिप्लीट्स अगदी गोल फुगतात. त्या इतक्या गोल होतात कि त्यांना हालचाल करणे कठीण होते व वारूळ सोडून जाणे शक्य होत नाही. अश्या ह्या गोल रिप्लीट्स वारूळाच्या छताला उलट्या टांगून रहातात. त्यांनी साठविलेले अन्न त्या पूर्ण मुंगी वस्तीसाठी उन्हाळी दिवसात, जेव्हा अन्न दुर्मिळ होते, तेव्हा उपयोगी पडते.

honeypots-hanging

या रिप्लीट मुंग्या मध पचन न करता, पोटाच्या गॅस्टर नावाच्या भागात साठवून ठेवतात. हा भाग खूप ताणला जाऊ शकतो. जेव्हा वस्तीला अन्नाची गरज असते तेव्हा त्या हा मध बाहेर काढू शकतात.
या फुग्यासारख्या रिप्लीट मुंग्या चालत्या द्राक्षासारख्या किंवा अ‍ॅम्बर मण्यांसारख्या दिसतात.
या मुंग्यांमध्ये इतके पौष्टिक आणि उर्जादायी पदार्थ साठविलेेले असतात कि त्या इतर प्राण्यांच्या - अगदी मानव प्राण्याच्या सुध्दा - भक्ष्य ठरू शकतात.
त्यांच्याच इतर प्रजाती वस्तीवर हल्ला करून, राणी मुंगीचा नाश करून, या कामकरी मुंग्याना गुलाम बनवून घेऊन जातात. या जातीची राणी मुंगी 11 वर्षे जगल्याचे नमूद केले गेले आहे. ती एका दिवसात 1,500 अंडीही घालू शकते.
अशी ही आगळी मध-मुंगी.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अचानक काही अनोखे .....

अचानक काही अनोखे……

दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरातील प्रेक्षणीय स्थळे कोणासाठीही अपरिचित नाहीत. पण कधी अनपेक्षितपणे काही नवीन समोर आले की एक वेगळाच आनंद मिळतो.

दिल्लीत मी जेथे रहायला होते ती जागा मुख्य शहरापासून जरा दूर, उपनगरासारखी होती. नवीन विमानतळ बांधण्यासाठी हरियाणातील एक पूर्ण गाव घेऊन तेथील गावकर्‍यांना पुनर्वसनासाठी रंगपुरी / नांगल दैवत येथे जमिनीचे प्लॉट दिले व तेथे या गावकर्‍यांनी एकाला एक लागून सारख्या दिसणार्‍या चार मजली लहान अद्ययावत इमारती बांधल्या. शहरात नवीन येणार्‍या नोकरदारांना भाड्याच्या घरांची सोय झाली. हे सर्व घरमालक, म्हणजे पूर्वीचे शेजारी आपापल्या इमारतींसमोर खुर्च्या, खाटा टाकून बसत आणि एकमेकांना हाकारून गप्पा मारत.

मी तेथे गेले ते नवरात्रीचे दिवस होते. घरासमोरून एक लांब अर्धा कच्चा रस्ता दूरवर जात होता. या सर्व हरियाणवी स्त्रिया रोज सकाळी नैवेद्याचे थाळे घेऊन त्या रस्त्यावरून दूर जातांना दिसत. आम्हीही कुतुहलाने संध्याकाळी फिरत त्या दिशेने गेलो. झाडीने घेरलेल्या मोकळ्या जागेत उबदार बदामी रंगाच्या सँडस्टोन्सची एक सुंदर गढी त्याठिकाणी होती.

ही होती सुलतान गढी.

File:Sultan Garhi Tomb.JPGMonumental mausoleum:The octagonal roof of Sultan-e-Ghaari.


येथे स्थानिकांची वर्दळ दिसते पण पर्यटकांची गर्दी नाही.  अशा या दुर्लक्षित आणि पर्यटकांद्वारे क्वचितच भेट दिल्या जाणार्‍या वास्तू आपल्या इतिहासातील मैलाचे दगडच आहेत असे म्हणावे लागेल.
आम्ही तिकीट घेऊन उंच दगडी पायर्‍या चढून वर गेलो. वास्तूचे मोठेमोठे दगड स्वच्छ नि सुंदर दिसत होते.  तेथील जे केअर टेकर आहेत, त्यांनी हा प्राचीन इतिहासाचा वारसा खूप छान जतन केला आहे.   चारी बाजूंनी उंच खांब, त्यापलिकडे व्हरांडे आणि दगडी भिंतींमध्ये कोरीव महिरपी नि मोठे झरोके आहेत. मध्यभागी संगमरवराचा अष्टकोनी चबूतरा आहे. वास्तूच्या चारी कोपर्‍यात असलेल्या बुरुजांमुळे ती छोट्याश्या किल्ल्यासारखी दिसते - म्हणूनच नाव सुलतान गढी किंवा राजाची गढी.

 हा भारतातील पहिला मकबरा – सुलतान इल्ततमशचा जेष्ठ पुत्र आणि रझिया सुलतानचा मोठा भाऊ नसिरूद्दिन महमंद याचा. नसिरूद्दिन महंमद हा बंगाल (तेव्हाचे लखनौती) गव्हर्नर होता.  तो पीर बाबा या नावाने ओळखला जाई आणि एक सूफी म्हणून तो पूज्य होता.  त्याचा मृत्यू 1231 मध्ये झाला तेव्हा त्याचे वडिल सुलतान इल्ततमश यांनी दिल्ली येथे त्याचा मकबरा बांधला.  नसिरूद्दिन महंमदच्या इतर दोन भावांच्या कबरी व त्यावरील छत्र्याही आसपासच्या परिसरात आहेत. 

सर्व बाजूंनी बंद असलेल्या चबूतर्‍यास एक छोटे द्वार आहे जेथून पायर्‍या अंधार्‍या खोलात कबरीपर्यंत उतरतात. या द्वारावर हळदीकुंकवांचे टिळे, शुभचिन्हे व फुले वाहिली होती. आतमध्ये पूर्ण अंधार असतो आणि पायर्‍या जपून उतराव्या लागतात. खाली तीन कबरी आहेत, परंतु कुठली कबर कोणाची वगैरे काही लिहीलेले नाही. इतर दिवशी अंधार्‍या कबरींजवळ काहीच हालचाल नसते.
परंतु दर गुरुवारी येथे पीर बाबाचा ऊरूस असावा तशी गर्दी जमते. केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदुही येथे जमतात.  दिवे आणि मेणबत्त्या त्या थंड, दमट काळोखाला उजळून टाकतात, आणी त्यांच्या धूराने सर्व वातावरण भारून जाते. सर्व जाती धर्माचे लोक येथे आपल्या प्रार्थना अर्पण करायला जमतात. कोणी धनिक दुपारच्या जेवणाचा लंगरही घालतात.
या सर्वात पुरातन मुस्लिम मकबर्‍याची पूजा केवळ मुसलमानच नव्हे, तर स्थानिय हिंदूही आपल्या पुराणपुरूषाला पुजावे त्या भक्तीभावाने करतात. याहून अधिक काय हवे?

Tuesday 25 August 2015

अबोली





  अबोली

"काय सुमंतराव, कसल्या विचारात हरवलात?" इन्स्पेक्टर रोकेंचा प्रश्न ऐकून सुमंत जरा चपापला आणि आत लॉक अपच्या दिशेने जाणार्‍या पॅसेजकडे सहजच नजर गेली होती असे भासवू लागला. तेव्हा रोकेच पुन्हा म्हणाले, "आहे, पोरगी गोड आहे, कबूल. पण शेवटी चोर ती चोरच ना? पोलिसांना चोरांबद्दल सहानुभूती ठेवून कसं चालेल, सांगा."
            "नाही हो, वाटत नाही ती चोर असावी असं," सुमंत जरा कळवळून म्हणाला, "विचारलं तर सारखं एकच म्हणते, मी चोरी नाही केली. पुन्हा, सुशिक्षित आहे, कॉलेजात शिकते. आणि खरोखरच, चोरी करू शकेल अशा बदमाष टाईपची नाही दिसत ती. . . ."
            "सगळे चोर एकच म्हणतात, मी चोरी नाही केली. आपली चोरी कबूल करणारा कोणी चोर बघितला आहे का आतापर्यंत?" रोके उसासा टाकत म्हणाले, "सरळ सरळ ओपन अ‍ॅन्ड शट केस आहे ही. भरपूर पैसेवाल्यांचं घर, स्वयंपाकाला येणारी गरिबाघरची मुलगी, कुठल्याश्या राजघराण्याकडून लिलावात घेतलेला पुरातन, अनमोल रत्नजडित हार बघितला, मोह झाला नि चोरी केली. चोरीचा हार तिच्या घरात मिळालाही, अजून काय हवंय? केस शट!"
            "ते सगळं खरं, पण तरीही . .  .कुठेतरी, काहीतरी बरोबर नाही असं वाटत राहातं. . ." सुमंत आपल्याच विचारात हरवल्यासारखा बोलला.
            "हं. . . .तसं थोडसं वाटतं खरं…" इन्स्पेक्टर रोके जरा गंभीर होत म्हणाले, "ते मि. समेळ, ज्यांनी आपल्या चोरीची तक्रार नोंदवली, ते तिच्याशी बोलायला आले होते, मदत ऑफर करत होते, जामिनाची व्यवस्था करू का, कोणी वकील शोधून देऊ का वगैरे विचारत होते. तर ही एक शब्दही बोलायला तयार नाही, गांगरून, बावरून टाळायलाच बघत होती. . . "
            "हे मला नव्हतं माहित!" सुमंत एकदम सतर्क होत म्हणाला. त्याची ही अचानक रिअ‍ॅक्शन बघून रोके मस्करी करण्याची संधी घेत, डोळे मोठे करत म्हणाले, "माहित असतं तर काय केलं असतं? तिला तिथल्या तिथे 'बाइज्जत रिहा' वगैरे केलं असतं का?"
            "तसं नाही…." सुमंत जरासा शरमला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, "पण तुम्हीच सांगा, हे जरा विचित्रच नाही कां? जे चोरीची तक्रार नोंदवतात, तेच स्वतः, चोर पकडला गेल्यावर चोराला मदत करायला येतात! काहीतरी गडबड नाही वाटत?"
            "अगदी तसंच काही नाही," रोके समजावण्याच्या सुरात म्हणाले, "चोरी झाली म्हणून तक्रार केली, त्यांचा माल मिळाला, त्यांचं काम झालं. पण ती मुलगी त्यांच्याच घरात स्वयंपाकाचं काम करत होती तेव्हा माणूसकीच्या नात्यांनं मदत विचारली तर त्यात काही वावगं तर नाही वाटत. . ."
            "मला नाही पटत," सुमंत मान हलवित म्हणाला, "एकतर ती काहीच बोलायला तयार नाही, पण तिची एकूण देहबोली, तिचा भाव यावरून वाटत कि ती निर्दोष असावी. तिला जेव्हा अटक केली तेव्हा काय एक दोन वाक्य बोलली तेवढीच….ती म्हणाली होती, त्यांच्या घरात दरवाज्यातून पॅसेजमधून सरळ किचन एवढेच तिचे जाणे येणे होते. बाकीचं घर, इतर खोल्या, कुठे अलमारी नि त्यात कुठे दागिने ठेवत ते सुध्दा तिला ठाऊक नव्हते, तर चोरीचा प्रश्नच कुठे येतो. त्यात घरमालकांचं असं मदत विचारणं ….."
            "पण त्यानं काहीही सिध्द होत नाही सुमंत," रोके स्थिर आवाजात म्हणाले, "पुरावा हवा कि ती निर्दोष आहे ….. म्हणजेच, दुसरं कुणीतरी गुन्हेगार आहे हे सिद्ध व्हायला हवं, तरच……."

सब इन्स्पेक्टर सुमंत पाटीलचे विचार काहीतरी मार्ग शोधण्यासाठी धावू लागले. रोकेसाहेबांनी कितीही थट्टा केली तरीही त्याचं म्हणणं खोडून काढलं नव्हतं किंवा ह्या केसवर पुढे काम करायची गरज नाही, केस बंद झाली असं म्हणून त्याला पाठी खेचण्याचाही प्रयत्न केला नव्हता. तेवढंही त्याला पुरेसं होतं.

त्याने अबोलीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती काढण्यापासून सुरूवात केली. तिचं नाव अबोली नाही, श्रुती आहे हे त्याला माहित होतं, पण ती प्रत्येक प्रश्नावर इतकी गप्प राहायची कि त्याच्यामते ती अबोलीच होती. राहायला गरीब वस्तीत, वडील नव्हते, आई चार घरी धुणंभांडी वरकाम करून जेमतेम घर चालवायची. मोठा भाऊ असून नसल्यासारखा, कुठेतरी परागंदा असायचा, कधी धूमकेतू सारखा उगवायचा. हिला शिकायचं होतं, म्हणून दोन तीन घरी स्वयंपाकाचं काम करून फीचे आणि आपल्या खर्चाचे पैसे कमावून कॉलेजात शिकत होती.

            ज्या इतर दोन घरी ती काम करायची, तिथे सुमंतने चौकशी केली. एका घरी, आम्हाला काहीच माहित नाही, असं म्हणून दरवाजा बंद करायची घाई केली. त्यांना पोलिसांच्या भानगडीत पडायचं नव्हतं, हे स्पष्ट होतं. दुसर्‍या बाई, ज्यांच्या घरी चोरी झाली त्या समेळांइतक्या श्रीमंत नव्हत्या. तेव्हा त्या पैश्याच्या दबावामुळे किंवा श्रीमंतांना खोटं कसं पाडायचं या विचाराने, त्यांच्याप्रमाणेच बोलू पाहात होत्या, पण त्याच वेळी श्रुतीला एकदम चोर म्हणायलाही धजावत नव्हत्या. "स्वभावाने अगदी गरीब, साधी मुलगी हो," त्यांच्या आवाजात जरा कळवळा होता, "येऊन चुपचाप आपलं काम करून जायची, कुणाच्या अध्यात ना मध्यात, ना उगाच जास्तीची बडबड. वयानं एवढी लहान, पण हाताला चव किती!" मग आपण उगाचच जास्त तर बोलत नाही ना ह्या भीतीने त्या बाई घाईघाईने म्हणाल्या, "पण आजकाल कुणाचं काही सांगता येतं का? कोण हमी देणार हो?" म्हणजे तिथेही पुढे रस्ता बंद!

केसमध्ये नमूद केलं  होतं कि श्रुतीला त्या उच्चभ्रु इमारतीत नोकरी लावली होती तिथल्या दरवानाने. सुमंतने त्या दामूकाकाला चौकीवर बोलावून घेतलं. ह्या आधीही त्याला बोलावून प्राथमिक विचारणा वगैरे झाली होती, पण चोरी सिध्द झाल्यानंतर पुढे काही चौकशीची जरूर पडली नव्हती. तो त्या मुलीच्याच वस्तीत राहणारा नि तिला, तिच्या आईला चांगलं ओळखणारा होता, नेहमीचं जाणं येणं होतं. 

पुन्हा चौकीवर बोलावल्यानं जरा बिथरून गेल्यासारखा वाटला, "आता पुना का? झालं ना सगळं?" तरीही सुमंतने शांतपणे विचारायला सुरूवात केली. "अवं, आता काय पुना पुना सांगणार?" वयस्कर दामू हात उडवून कावल्यासारखा बोलू लागला, "चूक केली, मोठी घोडचूक केली त्या पोरीला कामाला लावून. तिची आई मला बहिणीसारखी, चांगला घरोबा आमचा. हिला मदत करायला गेलो तर नाकच कापलं की माझं. . . " त्याचा वैताग समजण्यासारखा होता, पण सुमंतला एक गोष्ट जाणवली कि तो नजरेला नजर देऊन बोलायचं टाळत होता. चौकीवर बोलावून पुन्हा विचारपूस केल्याने बावरलाही असेल, पण तरीही त्याची सुमंतच्या मनाच्या कोपर्‍्यात कुठेतरी नोंद झाली.

इन्स्पेक्टर रोके अधून मधून चौकशी करत होते. त्यांनीच सुचविले कि समेळांची पार्श्वभूमी तपासून पाहावी. सुमंतच्या तपासातलीही पुढची पायरी तीच होती. मोठ्या कंपनीत परचेस विभागात अगदी वरच्या हुद्दयावर, वरची, आजूबाजूची कमाई भरपूर. त्यामुळे अगदी सुखवस्तू. शोभेशी पत्नी, दोन मुलं – मोठी मुलगी परदेशात उच्च शिक्षणासाठी गेली होती, तर धाकटा मुलगा उटीच्या बोर्डींग स्कूलमध्ये शेवटच्या वर्षाला होता. कसं छान चित्र होतं. पण जरा जास्त खोलात गेल्यावर त्या चित्राचे वेगवेगळे रंग दिसू लागले.

इतकी कमाई असूनही समेळांना कर्जही बरंच होतं, आणि अलिकडे ते वाढत चालल्याचं दिसत होतं. एकतर उच्च राहाणी, त्यातूनही इतर बरेच खर्च. इतक्या वरच्या हुद्दयावरचे साहेब म्हंटल्यावर कोणी उघड उघड चर्चा करत नव्हते, पण एकंदरीत त्यांच्या हाताखाली काम करायला ऑफिसातल्या तरूणींची तयारी नसे. तसे अगदीच रानटी पशुवृत्ती दाखवत असे नाही, पण मुलींवर बरेच पैसे खर्च करून, मोठमोठ्या भेटी देऊन त्यांना वश करायचा नेहमीच प्रयत्न जारी. त्यामुळे पैशांची कमी, ती भरून काढण्यासाठी जुगार - रेस, त्यात अजूनच कर्ज. असा सगळा प्रकार होता.
जश्या जश्या चौफेर चौकश्या पुढे सरकत गेल्या तशी सुमंतच्या विचारचक्रांना गति मिळू लागली. एका दुपारी सुमंतला आपल्या दारात पाहून मिसेस शोभा समेळांना आश्चर्यच वाटलं. त्याच्याबरोबर त्याच्याच वयाचा दुसराही एक तरूण होता. या, बसा झाल्यानंतर सुमंत म्हणाला, "हा चिराग, माझा मित्र आहे. ज्वेलरी डिझाईन करतो. ह्या केसबद्दल ऐकलं तेव्हापासून त्याला तो अ‍ॅन्टिक नेकलेस बघायची खूप इच्छा आहे. तसदी होणार नसेल तर जरा पहायला मिळेल का…..?"
 समेळबाईंनी अतिउत्साहाने आत जाऊन तो हार आणला. ही केस झाल्यापासून त्या नेकलेसची बरीच जाहिरात झाली होती आणि त्यांना खूपच भाव मिळत होता. त्यामुळे त्या तश्या खूश होत्या.
चिराग डोळ्याला जवाहिर्‍यांचं भिंग लावून तो नेकलेस निरखेपर्यंत त्या आत चहापाण्याचं बघायला गेल्या. दोन मिनिटातच चिरागने भिंग काढून हार बाजूला ठेवला. सुमंतने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या. चिरागने मान नकारार्थी हलविली. "खात्री आहे तुझी?" सुमंतने दबल्या स्वरात विचारले. "अगदी पूर्णपणे." चिराग हळू पण ठामपणे म्हणाला. तेवढ्यात मिसेस समेळ चहा घेऊन आल्याच, ते दोघेही गप्प झाले.

तपासाच्या साखळीच्या पुढच्या कड्या जुळवणे फारसे मुश्कील नव्हते. चोरीचा उंची माल विकण्याच्या छुप्या अड्ड्यांवर अचानक छापा, दामूकाकाची अगदी खोलात जाऊन उलट तपासणी, अजून एकदोन चौकश्या वगैरे झाल्या आणि सुमंतच्या चेहर्‍यावर जरा समाधान दिसू लागलं.

श्रुतीला मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे आणण्याच्या वेळी केसशी संबंधित सर्वच तिथे उपस्थित होते. केसची कारवाई पुढे सरकण्याआधीच सुमंतने, श्रुतीसाठी दिल्या गेलेल्या वकील सान्यांना खूण केली. "संशयित आरोपी कुमारी श्रुती निर्दोष आहे हे सिध्द करण्याइतके पुरावे पोलिसखात्याने एकत्रित केले आहेत. ते पेश करण्याची परवानगी मिळावी." सान्यांनी अर्जी केली. ती मान्य होताच सुमंतने एकेकाला समोर आणले. 

सुमंतने समेळ्बाईंना सांगितले तसा चिराग डिझाईनर नव्हता तर मान्यता प्राप्त रत्नपारखी होता. त्याने आपल्या साक्षीत स्पष्टपणे सांगितले कि जो हार चोरीचा म्हणून श्रुतीच्या घरात मिळाला आणि तोच जो आता समेळबाईंच्या ताब्यात होता, तो नकली होता. असली हार चोरबाजारातल्या एका दलालाकडून जप्त करण्यात आला होता आणि त्या दलालानेही ते मान्य केले.
थकलेल्या, घाबरलेल्या दामूकाकांनी आपल्या कबूलीजबाबात सांगितले कि त्यांनीच तो हार समेळांच्या दबावाखाली श्रुतीच्या घरात नेऊन लपवला होता, पण दामूकाकांना हे अजिबात माहित नव्हते कि तो नकली हार होता. केस आता स्पष्टपणे पुढे आली होती.

जेव्हा खूपच पैसे हाती होते तेव्हा समेळांनी तो अतिशय किमती हार आपल्या पत्नीला घेऊन दिला होता. पण कर्ज वाढत गेले तशी पैशाची गरज भासू लागली. आपली बायको तो हार किंवा इतर काहीही किमती गोष्टी विकू देणार नाही याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी तसाच नकली हार बनवून घेतला. खरा नेकलेस चोरबाजारात विकून, नकली हार दामूवर दबाव टाकून त्याच्याकरवी श्रुतीच्या घरात लपवला. असं करण्यामागे त्यांचे दोन हेतू होतेः हार मिळाला, चोर पकडला गेला म्हणजे पुढे काही चौकशी होणार नाही आणि खरा हार विकला गेला आहे याचा कोणाला संशयही येणार नाही.

दुसरं म्हणजे श्रुतीला ह्यात अडकवून त्यांना तिचा बदला घ्यायचा होता. समेळांनी तिच्या दिशेने केलेले सारे प्रयत्न तिने धुडकावून लावले होते, त्यांना अजिबात दाद दिली नव्हती ह्याचा त्यांनी मनात डूख धरला होता. पुन्हा, तिला अटक झाल्यावर साळसूदपणे येऊन त्यांनी तिला मदतीची ऑफर केली, म्हणजे ह्या उपकारामुळे तरी ती आपल्या आंगठ्याखाली राहील या हेतूने. असे त्यांनी चोरीच्या एका दगडाने बरेच पक्षी मारण्याचा प्रयत्न केला होता.

तसं पाहिलं तर चोरीची गरजही नव्हती; त्यांना फक्त त्या असली नकली हारांची अदलाबदल करून खरा नेकलेस विकता आला असता. पण पुढे मागे समजा काही प्रसंगाने घरातला हार (पॉलिशसाठी, दुरूस्तीसाठी) दुकानात गेला आणि नकली आहे हे उघडकीस आले तर पूर्ण संशय त्यांच्यावरच आला असता, म्हणून चोरीचा सर्व खटाटोप. याच कारणास्तव तो हार श्रुतीच्या घरात मिळताच ताबडतोब त्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. सुरूवातीला त्यांची सर्व चाल यशस्वीही झाली. पण आता सुमंतने जे पुरावे आणि साक्षीदार पुढे आणले त्यानंतर कोर्टालाही श्रुतीला निर्दोष मान्य करावे लागले.

सुटका झाल्यावर काय बोलावे ते न सुचुन ती भारावल्यासारखी गप्पच सुमंतपुढे उभी राहिली. तेवढ्यात दामूकाका रडतच आले नि तिच्यापुढे हात जोडू लागले, "


 
माफ कर पोरी, मी कधी असं केलं नसतं. पण समेळसाहेबांनी धमकी दिली कि मी त्यांचं ऐकलं नाही तर मला सोसायटीच्या दरवानाच्या नोकरीतून काढून टाकतील. बाकी कुठल्या धमकीला डरलो नसतो ग, पण नोकरी गेली तर दुसर्‍या कामावर कोणी ठेवणार नाही आणि या वयात काय करणार, कुठुन कमावणार आणि पोराबाळांना काय खाऊ घालणार? नाही तर तुझा घात नसता केला कधी……. ह्या धाकट्या इन्स्पेक्टर साहेबांनी वाचवलं मला मोठ्या पापातून!" त्यांचं ऐकता ऐकता श्रुतीच्याही अश्रुधारा सुरू झाल्या.

"पण आता तर सगळं ठीक झालं ना?" सुमंत समजावत म्हणाला. श्रुतीने काही न बोलता नुसती मान डोलावली. "मग आता का ह्या गंगाजमुना?" सुमंतने हैराण स्वरात विचारले, तेव्हा त्या आसवांतूनही तिच्या ओठावर अस्फुट हसु उमलले …… श्रावणसरींतून हलकेच इंद्रधनुष्य फुलावे तसे.
                                                                        समाप्त

Sunday 23 August 2015

पाहुणी









पाहुणी

"हाय एव्हरीवन!" त्यांचा सगळा ग्रुप बसला होता आणि कुशलाने येऊन थोड्या उत्साहानेच घोषणा केली, "एक न्यूज आहे! माझी ना कझीन येतेय यूएसएहून. ती आहे आपल्याच वयाची, पण तिचं सगळंच आयुष्य तिथे गेलं ना, त्यामुळे आपल्या कल्चरची . . .संस्कृतीची फारशी ओळखही नाही. म्हणून तिच्या समर व्हेकेशन मध्ये तिला इथे पाठवत आहेत. आणि ती जबाबदारी टाकलीय माझ्यावर – म्हणजे बहुतेक वेळ ती आपल्याबरोबरच असेल. म्हणजे . . .चालेल ना?" कुशलाने सर्वांवरून नजर फिरवत विचारले.

बहुतेक सर्वांनी खांदे उडवले. "आपल्याला काय हरकत असणार बुवा?  जोपर्यंत तिला उचलून सगळीकडे न्याव लागत नाही तोवर आपलं काय जातयं?" बंकीमने सर्वांचं मत प्रकट केलं. "आपल्याला काही प्रोब्लेम नाही, पण तिला इथे कुठल्या कल्चरल गोष्टी मिळणार आहेत? म्हणजे, आपण आता – काय म्हणतात ते- अगदी पारंपरिक थोडीच आहोत?" निकीने खरी ती गोष्ट दर्शवून दिली. "अरे, काही ना काही छोटे मोठे फंक्शन्स असतातच," तिसर्‍या कुणी मदतीची सूचना मांडली, "अमेरिकेपेक्षा तर जास्तच 'कल्चर' मिळेल इथे, हो ना?"

सर्वांच्या बोलण्याकडे कुशलाचं अर्धवटच लक्ष होतं. तिला जयची प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता अधिक होती. सर्वांकडे बघतांना तिने ओझरता कटाक्ष जयकडे टाकला. त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट नाराजी होती. तिचं लक्ष जाताच त्याने नाक मुरडून दाखवले. त्याची नाराजी बघून कुशला मनात थोडी सुखावली. कुशलाबरोबरचा वेळ इतर कुणात विभागून देण्याची त्याची इच्छा नव्हती, असाच का त्याच्या प्रतिक्रियेचा अर्थ?

त्यांचा ग्रुप अगदी ज्युनिअर कॉलेजपासून एकत्र होता. आता वेगवेगळ्या दिशांना पांगण्याची वेळ आली होती. कुणी पुढच्या उच्च शिक्षणासाठी तर कुणी जॉब ट्रेनिंगसाठी. ज्यांना नोकरी करायची होती त्या बहुतेकांना कॅम्पस इन्टरव्ह्यू मध्येच जॉब मिळाले होते. त्यामुळे सर्वांच्या नवजीवनाची सुरूवात साधारण एकदमच होणार होती. मध्यंतरात हा जेमेतेम एक दीड महिना त्यांना स्वतःसाठी मोकळा मिळाला होता. सर्वांनाच पूर्ण कल्पना होती कि एकदा का सगळे आपापल्या चक्रात अडकले कि पुन्हा पूर्वीसारखे अड्डा जमवून गप्पा मारणे, मूव्हीजना जाणे, शॉपिंग किंवा वाढदिवसाच्या पार्ट्या करणे सहज शक्य होणार नव्हते. म्हणून प्रत्येकजण मिळणार्‍्या एकएक क्षणाची मौज घ्यायला बघत होता.

थोड्या वेळाने जय सहजच आल्यासारखा कुशलाच्या बाजूला येऊन बसला. "काय हे कुशल," तो हळू आवाजात पण नाराजीने म्हणाला, "मी विचार करत होतो, हा थोडाच जेवढा वेळ मिळेल तेवढाच. आणि तुला हाच वेळ मिळाला का कुणालातरी बेबी सिट करण्यासाठी बरोबर घेऊन फिरायला?"

कुशलाच्या अंतरंगात कुठेतरी काही तरी हुरहुरलं. वरकरणी शांतपणे ती म्हणाली, "अरे, मी तरी काय करणार? तिचे आईवडिल तिला सुट्टीसाठी एकटीला पाठवून देत आहेत. माझ्या मम्मीपप्पांना त्यांच्या नोकर्‍या आहेत. ते सर्वच आले असते तर मम्मीपपांनी सुट्टी घेतली असती, पण हिच्या एकटीसाठी…..आणि मी सध्या पूर्ण मोकळी आहे. पुन्हा, ती आहे ही आपल्याच वयाची, मोठ्यांबरोबर बोअर होईल. तेव्हा आपल्याबरोबरच……"
"ते सगळं खरं ग, पण….." जय खरोखरच हिरमुसला दिसत होता, "पण माझ्या सगळ्या प्रोग्रॅम्स नि प्लान्सवर पाणी फिरलं ना…." त्याचे एवढे शब्दही तिच्यासाठी खूप होते.

त्यांच्या ग्रुपमध्ये सगळेच एकमेकांचे चांगले दोस्त होते. पण तिच्यासाठी जय खास होता आणि बरेचदा तिला वाटे कि त्याच्यासाठीही तीच खास मैत्रिण होती. जसजसे शेवटचे वर्ष संपत आले तसे त्या दोघांचे डोळे एकमेकांशी जास्त बोलू लागले. आणि आता तर हा महिना दीड महिन्याचाच काळ त्यांच्या हाती होता. कदाचित चारपाच वर्षांची मैत्री या कालावधीत पुढची पायरी गाठेल …..निदान दोघांच्या नजरा तरी तेच बोलत होत्या.

आणि आता जयने तर प्रत्यक्ष तसं बोलूनही दाखवलं . न जाणे काय प्लान आखले होते त्याने? या विनयालाही आताच यायला हवं होतं का? ती मनात चुटपुटली. पण पुन्हा स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न केला. हा मोलाचा वेळ हातचा सुटून जात होता, कबूल. पण त्यानंतरही ते दोघे अजिबातच भेटू शकणार नाही असं तर नव्हतं. हां, आताच्या सारखा आरामाचा वेळ नंतर मिळणार नव्हता, सतत दुसर्‍या दिवशी ऑफिसला जायचं टेन्शन असणार हे कबूल, पण भेटीगाठी तर जरूर होतीलच – हेच समाधान तिने मानून घेतलं.

समज आल्यानंतर तशी पहिल्यांदाच कुशला विनयाला भेटत होती. तिला आवडली विनी. दिसायला तर गोड होतीच पण वागण्यातही कुठे 'मी अमेरिकन' असा बडेजाव नव्हता. विनी आल्यानंतर कुशलाच्या मम्मीने घरीच दोन दिवस तिची सरबराई केली. तोपर्यंत तिचा जेट लॅगही बराच कमी झाला. त्यानंतर्च कुशला तिला सर्वांना भेटायला घेऊन गेली.
ग्रुपने तिचं स्वागत तर अगदी मनापासून केलं – आणि त्याचं कारण तिने सर्वांसाठी आणलेली चॉकलेट्स नव्हती हेही कुशलाला नक्की ठाऊक होतं. ती त्यांच्यात कुणी बाहेरची आहे असं ग्रुपने तिला अजिबात एकटं पडू दिलं नाही. विनीलाही आपण अमेरिकेत जन्मलो, वाढलो याचा जराही वरचढ भाव नव्हता. तिच्या भाषांनी सर्वांचीच करमणूक होत होती.  तिचे अमेरिकन उच्चार ऐकण्यासाठी सगळे मुद्दाम तिला इंग्लिश बोलायला सांगत. तिचं मराठी तर त्याहूनही गंमतशीर होतं आणि ती ही खुलेपणाने हसे नि चुका सुधारायला सांगे. कुशलाला जरा हुश्श्य वाटलं. तिला थोडीशी चिंता होती कि विनी जर का अगदीच पाश्चात्य मेम निघाली किंवा तिच्या दोस्तांनीही जर का, हे काय लोढणं बरोबर बाळगायचं असा पवित्रा घेतला तर सगळच अवघड झालं असतं. पण आता हे ठीक होतं.

पूर्ण गँगने मिळून आधी तिच्यावर खास भारतीय अन्नपदार्थांचे संस्कार करण्यापासून सुरूवात केली. वडापाव, तिखट भेळपुरी, पाणीपुरी यांनी पहिल्याच दिवशी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा काढल्या. पण ती ही सारं एन्जॉय करत होती. मग पारंपारिक का सांस्कृतिक काय म्हणतात त्या नावाखाली काय दाखवावे यावर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. सर्वांचीच गती त्या दिशेला जरा कमीच होती. मग काहीच नाही, तर देवळं दाखवू या अशी टूम निघाली. सर्वांसाठीच ही एक मजाच होती.

बंकीमचा मोठा भाऊ नवीन घरात राहायला जाणार होता, तेव्हा त्या घराची वास्तूपूजा होती. एरवी हे सगळे फक्त संध्याकाळी पार्टी करायला गेले असते. पण आता सगळेच सांस्कृतिक धारांमध्ये अगदी पूर्ण न्हाऊन निघाले होते. पोरींचा उत्साह विनीला ट्रॅडिशनल पध्दतीने सजवण्यातच जास्त होता.

देवळात गेले असतांना, ह्या गृहपूजेच्या वेळीही, जय स्वतःहून विनीला बर्‍याचश्या गोष्टी समजावून सांगत होता. अरे वा! जयला धर्म पुराणाच्याही इतक्या गोष्टी ठाऊक आहेत की काय, या विचाराने कुशलाला कौतुक वाटलं. बाकीचे त्याच्या स्पष्टीकरणाची मस्करी करू लागले तशी जय म्हणाला, "एकतर नुसतं पाहून तिला काहीच कळणार नाही. सर्व पाश्चात्यांप्रमाणे विनीही हा कसला जादूटोण्यांचा देश, असच समजेल. आणि तुम्ही कोणी काहीतरी विचित्रच समजावून देण्यापेक्षा मीच तुमच्यात बरा!"
विनीला ही सगळ्यात बराच इंटरेस्ट वाटत होता; ती त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारत होती, खुलासे मागत होती.

तोवर गणपतीचे दिवस आले. जयच्या घरी दरवर्षी गौरी-गणपती येत असल्याने त्याने विनीला रोज घरी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले.
"अरे जय, सार्वजनिक गणपतीही कितीतरी असतात की," कुशला जरा अवघडून त्याला म्हणाली, "विनीला बघायला मिळेल सगळीकडेच. त्यासाठी तुझ्या घरी आणि ते सुध्दा रोज कशाला बोलावायला हवे? म्हणजे….अरे, माझ्या पाहुण्यांचं तुझ्या घरच्यांना कशाला ओझं?"
"तू तरी कमालच करतेस हं," जय तिला म्हणाला, "अग, गणपतीत आमच्या घरी इतक्या नातेवाईक आणि मित्रमंडळीचं येणंजाणं होत असतं की त्यात एका माणसाचं ओझं होणार आहे का? आणि सार्वजनिक गणपती बघेल ग ती, पण घरातले पूजापाठ, नैवेद्य, प्रसाद या गोष्टी बघायला मिळणार आहेत का? आमच्या घरी गणपतीबरोबर गौरीही बसतात, ती आरास वगैरेही तिला पाहायला मिळेल. आणि हो, तिची रोजची येण्या-जाण्याची चिंता तू करू नकोस. मी रोज बाईकवरून तिला घेऊन जाईन आणि सुखरूप आणून सोडीन, मग तर झालं?"

आता तर कुशला अस्वस्थच झाली. जयने विनीकडे जास्त लक्ष देणं तिला जरा खटकलंच होतं. पण ती आपली बहीण आहे त्यासाठी जय खास मदत करतोय, हे सर्व तो तिलाच खुश करण्यासाठी करतोय अशीच तिने आपली समजूत घातली. पण आता हे रोजच स्वतःच्या घरी येण्याचं आमंत्रण आणि ते सुध्दा तिला वगळून एकट्या विनीला…..? बाईकबरून रोज विनीला नेलं-आणलं तर कुशलाचा सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, नाही का?...... हे काय होतं होते ते कुशलाला समजतच नव्हतं.

गणपतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे त्यांचा सगळाचं ग्रुप जयच्या घरी गेला. दुसर्‍या दिवशी कुशलाला आशा वाटली कि बाईकचं तो विसरून गेला असेल. जर त्याने फोन करून विनीच्या आमंत्रणाची आठवण करून दिली, तर आपणच तिला घेऊन जाऊ. आपण बरोबर असलो म्हणजे त्यालाही आठवण राहील कि मुळात त्याची मैत्रीण कोण आहे ते.
ती असा विचार करेपर्यंत पाहाते तर विनी बाहेर जाण्यासाठी तयार होऊन बसलेली. कुशलाने विचारल्यावर विनीने सांगितले कि जयने तिला फोन करून अकरा वाजता तयार राहायला सांगितले नि तो खाली पोहोचल्यावर पुन्हा मिस कॉल देणार होता.
कुशलाने वरकरणी हसण्याचा प्रयत्न केला पण आतून खचून गेल्यासारखी झाली. आता तिला वळसा घालून थेट विनीशीच संपर्क? जय आपल्याला आता ओळखतो तरी का, असा काही तरी वेड्यासारखा प्रश्न तिच्या मनात उभरला.

जय वरती घरापर्यंतसुध्दा नाही आला, खालूनच विनीला बोलावून घेऊन गेला. कानामागून आली नि तिखट झाली ……कुशलाला विनीचा राग आला. का हिला आताच यायचं होतं इथे? आधी तर फक्त सुट्टी गेली याची हळहळ होती. पण आता तर विनी तिच्या जयलाच तिच्यापासून दूर घेऊन जात होती. ही कोण होती त्या दोघांच्या मध्ये येणारी? – कुशला मनात चरफडली. रडकुंडीला आली होती. किती खुशीत होती ती – शिक्षण चांगल्याप्रकारे पूर्ण झालं होतं, छानशी नोकरी हातात होती, तिचा मनपसंत इतल्या वर्षांचा मित्र जय तिला आयुष्याची जोडीदारीण होण्याचा प्रश्न विचारणारच होता याची तिला खात्री होती….. या सर्व गुलाबी चित्रात अचानक वरून काळा ढग उतरावा तशी बाहुलीसारखी गोड विनी येऊन टपकली होती.

उशीत तोंड खुपसून कुशलाने अश्रूंना मोकळी वाट करून दिली. बरं तर बरं घरी कुणी नव्हतं. मम्मीपप्पा ऑफिसला आणि धाकटा कुणाल कॉलेजात गेला होता. विनी गेल्यावर तिने आसवांनी मन मोकळं करून घेतलं. पण घरी कुणी असतं तर बरं झालं असतं, असं रडून तिने आपलं मन दुखावून घेतलं नसतं.

एकटी आढ्याकडे पहात पडल्या पडल्या विचार करत राहिली. विनीचं आणि जयचं वागणं पुन्हा पुन्हा आठवत राहिली. विनीला दोष देता येण्यासारखा नव्हता, ती सर्वांशीच सारखं वागत होती. कितीही आठवून पाहिलं तरी विनी जयबरोबर खास जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती असं वागणं काही तिला आठवेना.
तसं पाहिलं तर ….. जयसुध्दा काही अगदी गळेपडूपणा करत होता असही नाही. हा केवळ योगायोग असू शकतो कि त्याच्याकडे विनीला शिकवण्यासारख्या बर्‍याच गोष्टी होत्या, तसच गौरी गणपतीही त्याच्याच घरी येत होते, बाकी कुणाकडेही नाही. केवळ कुशलाचा त्रास वाचवण्यासाठीही कदाचित त्याने विनीला नेण्याचे आणि आणून सोडण्याचे काम स्वतःवर घेतले असेल. काय समजावं हेच तिला कळत नव्हतं.

कितीही डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपत नसते – असंच काहीसं होत होते. विनी तर केवळ मैत्रीनेच वागत होती आणि जयला टोकायला कुशला काय त्याची लग्नाची बायको थोडीच होती? आपला कडवटपणा दाखवून, तोंड वाकडे करून काय साध्य होणार होते? तिचे स्वतःचेच दुःख वाढले असते. आपले विचार आपल्यापाशीच ठेवून कुशला सर्वसाधारणपणेच वागत राहिली.

आता मित्रमंडळातील सर्वांनाच नव्या नोकर्‍यांवर रुजू व्हायचे वेध लागले होते. त्यासाठी ड्रेसेसची खरेदी तर जरूरीच होती. विनीलाही परत घेऊन जाण्यासाठी खास इंडियन ड्रेसेस हवे होते. तिच्या खरेदीत कुशला मुद्दामच जरा बाजूला राहिली. आणि तिच्या अंदाजाप्रमाणे जयने पुढाकार घेऊन विनीला मदत केली.

नोकरीच्या घाण्याला जुंपण्याआधी एकवार शेवटची ट्रिप म्हणून आणि विनीसाठी म्हणूनही सगळ्यांनी एलेफंटा केव्हज् जायचं ठरवलं. कुशलाच्या मनाची स्थिती पहिल्यासारखी राहिली नव्हती. पण नाही म्हणणे विचित्रच दिसेल यासाठी ती काही बोलली नाही.
मोटार लाँचमध्ये चढतांना आणि घारापुरीला उतरवून घेतांना जयने दोन्ही हातांनी विनीला आधार दिला. कितीही दुर्लक्ष करायचे ठरविले तरीही या गोष्टी आपोआपच कुशलाच्या नजरेत खुपत राहिल्या. लेण्यांकडे जातांना थोडा चढणीचा रस्ता होता, तिथे कुशलाचा पाय लचकला नि मुरगळला पण त्याबद्दल ती कुणाला काही बोलली नाही. आता मनःस्थितीच अशी झाली होती कि कुणाकडे काही बोलायची इच्छाच होत नव्हती.

ती हळूहळू सर्वांच्या पाठी चालत राहिली. कुणी विचारलंच, तर, पूर्वी सगळं बघितलय, पुन्हा काय बघायचय…असं काहीतरी गुळमुळीत उत्तर देऊन टाळत राहिली. ती लेण्यांच्या आत गेली नाही. बाहेरूनच पुढच्या मोकळ्या जागेत आणि लेण्यांमध्ये फिरणार्‍या आपल्या मित्रमैत्रिणींना पाहात राहिली. एक बर्फासारखी थंड शिरशिरी मणक्यांतून वर सरसरत जावी तशी तिला जाणीव झाली की फिरतांना जय आणि विनीचे हात एकमेकांत गुंफले होते --- कुशलाने क्षणभर डोळे मिटून घेतले.

त्यानंतर कुशलाने आपली नवीन नोकरी, पहिल्यांदाच ऑफिसात जाण्याची तयारी या सर्वात स्वतःला गुंतवून घेतलं. विनीच्या परतण्याचा दिवस जवळ येत होता. ती मम्मीबरोबर जवळच्या नातेवाईकांना भेटून येण्याचं काम उरकून घेत होती.
शेवटचे तीन-चार दिवस विनी बरीच गप्प गप्प वाटत होती. कदाचित परत जायच्या विचाराने असेल, असं समजून कुशलाने जास्त काही विचारले नाही. या शेवटच्या दोन-तीन दिवसात जय जास्तीत जास्त वेळा विनीला भेटायला येईल असे कुशलाला वाटले होते. पण त्याचा कुठे पत्ता नव्हता. अर्थात फोनवरून सतत विनीशी बोलतही असेल, तिला थोडीच हे कळणार होते? कुशला शक्यतो हे विचार टाळण्याचा प्रयत्न करत होती.

शेवटच्या दिवशी विनी गप्प गप्पच होती. रात्री तिची जायची वेळ झाली. सगळी फॅमिली तिला सोडायला जायला निघतच होती. तेव्हा विनीने कुशलाला एका बाजूला खेचले आणि दबल्या स्वरात म्हणाली, "माझं एक काम करशील? जयला जरा समजावशील?"
कुशलाने गोंधळून प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं. "तुला… माहीत नसेल कुशला….." विनी अडखळत म्हणाली, "लास्ट वीकमध्ये….जयने मला…..प्रपोज केलं. मी…मी…मला अशी काही कल्पनाच नव्हती कि तो ……त्याच्या मनात असं काही असेल. मला…..माझा तिकडे ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे. मी….इथे कुणाला बोलले नाही….माझी मम्मी म्हणाली होती कि ह्या गोष्टी …..इथे कुणाला आवडणार नाहीत म्हणून. मी जयला सगळं सांगितलं. त्याला वाईट वाटलं असेल. तू ही जरा समजावशील….?"

कुशलाला हसावं का रडावं ते कळेना. जयने विनीला प्रपोज करणं हे तसे अपेक्षितच होते. पण विनीच्या उत्तराने सगळंच कसं उलट पुलट झालं होतं. कुशला नि जयच्या खास दोस्तीबद्दल काहीच कल्पना नसलेली विनया उलट तिलाच विनवत होती कि जयला समजाव कि विनी कुणा दुसर्‍याला शब्द देऊन चुकलीय.

"पण….पण विनी," कुशला काहीतरी आठवून बोलली, "जयला…..किंवा कोणालाच ही कल्पना येणं शक्य नव्हतं कि तुझा बॉयफ्रेंड असेल. तू….तुझं वागणं ….म्हणजे, तू जयबरोबर हातात हात गुंफूनही फिरत होतीस. तेव्हा त्याची अशी समजूत झाल्यास काय नवल?"
"अं?....ओह्….. त्याने….तोच माझा हात धरायचा," विनीने घाईघाईने स्पष्टीकरण दिले, "मी….मला नव्हतं माहीत कि त्याचा काही स्पेशल अर्थ होईल. फ्रेंडस् फ्रेंडस् हात पकडतात ना….?" ती खरंच गोंधळली होती.

"चला पोरींनो….झालं कि नाही तुमचं हितगुज?" कुशलाच्या मम्मीने आवाज दिला तेव्हा त्या दोघींना निघावे लागले. कुशलाने विनीच्या खांद्यावर थोपटून सर्व सांभाळून घ्यायचं आश्वासन दिलं.
"जयने मला, कुणाला सांगू नको म्हणून सांगितलं….तेव्हा तू त्याला सरळ सरळ विचारू किंवा समजावू नकोस हां…." विनीने निघता निघता तिला बजावले.  "कळलं, मी सांभाळेन सगळं," कुशला म्हणाली.

तिच्या अपेक्षेप्रमाणे दोन-तीन दिवसांनंतर जयचा फोन आला – कुठे भेटायचं ते ठरवण्यासाठी. त्याच दिवशी नवीन ऑफिस जॉईन केलय, तेव्हा वेळ होणार नाही असं सांगून तिने टाळलं.
रात्रभर विचार करत राहिली….कारणं सांगून ती त्याला किती दिवस टाळू शकणार होती? का भेटून काय ते नक्की करावं? पण काय निर्णय घेणार? तो काय बोलणार, विचारणार याची तिला पूर्ण खात्री होती. आता निर्णय सर्वस्वी तिच्यावरच अवलंबून होता. पुढचं पाऊल काय उचलायचं हे तिलाच ठरवायचं होतं.

ती खुश होती का? खरंतर आनंद व्हायला हवा होता तिला. विनीचं घाबरवू पहाणारं सावट आता दूर झालं होतं. विनी स्वतःच्या रिलेशनशिपमध्ये पूर्णतः कमिटेड होती त्यामुळे दूर राहूनही जय सोबत निखळ मैत्रीखेरीज अन्य काही संबंध ठेवेल अशी शक्यताही नव्हती. मग आता तर जय सर्वस्वी कुशलाचाच होता …. अगदी पहिल्यासारखाच. तर ही खुशीचीच गोष्ट नव्हती का?

मध्यंतरी काही झालंच नाही असं भासवून मागल्या पानावरून पुढे चालू, …… का……? विनी आल्यावर ज्या वेगाने आणि पूर्णपणाने तो कुशलाला विसरला होता, तेच पुन्हा दुसरी कुणी मुलगी आयुष्यात आल्यावरही होणं सहज शक्य होते. आतापर्यंत त्या दोघांनी एकमेकांना काहीच वचनं दिली घेतली नव्हती, तोवरच हे वर्तन पहायला मिळालं म्हणून निदान तिला भविष्याचा अंदाज तरी आला होता. तर मग हे उमगल्यानंतरही कळून सवरून त्याच मुलाबरोबर भविष्याची स्वप्ने रंगवायची?

पण कदाचित ही केवळ एक चुकून घडलेली घटना असू शकते. ती त्याला इतकी वर्षे ओळखत होती. ग्रुपमध्ये इतर मुली होत्या, कॉलेजातही खूप होत्या. पण कधी त्याच्या वागण्यात अस्थिरपणा दिसला नव्हता. केवळ विनीच्या बाबतीत …… का तिच्या जोडीला एक अधिक आकर्षण होतं, अमेरिकेला जाण्याचं? का तो खरोखरच सिरियसली गुंतला होता विनीमध्ये? विसरू शकेल विनीला? काय बरोबर काय चूक हे तिला कळेनासं झालं होतं ---

पण एकदा जे झालं होतं ते तिने प्रत्यक्ष पाहिले होते. ती असतांनाच, तिच्या समोर झाले होते. ती पुढ्यात नसतांना, पुन्हा केव्हा काय होईल, त्याचे वागणे कोणाबरोबर कसे असेल हे ती कधी विश्वासाने, खात्रीपूर्वक सांगू शकेल? म्हणजे पूर्ण आयुष्यच असं संशयाच्या, अविश्वासाच्या जाळ्यात स्वतःही गुरफटणार आणि त्यालाही त्यात ओढणार. हे असं भविष्य?
कुशलाच्या मनाचा निर्णय ठरला.

समाप्त
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------



Friday 21 August 2015

पडछाया






पडछाया
"अरे निशांत, मी ऐकलं ते खरं का रे? अरे हे आत्मघातकी विचार कधी यायला लागले तुझ्या मनात, अं?" किरीटने अर्धवट थट्टेने, अर्धवट गंभीरतेने विचारले. निशांतने उद्वेगाने आपल्या आधीच विस्कटलेल्या केसांतून हात फिरवला, "ए बाबा, आठवणही नको करून देऊस रे ….."

"अरे, पण मग का हा निर्णय घेतलास? कारण काय?" किरीटनेही आता जरा हैराण स्वरात विचारले, "आपण किती महत्वाकांक्षेने हे नाटक हाती घेतलं. आणि तुला कोणी तरी अडगळीत कोळीष्टकांनी वेढलेली म्हातारीच – सॉरी, प्रौढाच—भेटली का? अरे आईचा रोलही महत्वाचा आहे त्यात……"

"मला माहित नाही का ते?" निशांत खरोखरच वैतागला होता, "अरे, त्यांनी निरोप पाठवला – नात का बाजूची कोणी होती—बाबांच्या बरोबर त्यांनी काम केलं होतं त्याची आठवण वगैरे करून दिली….."
"अरे पण भिसेकाकांनी हजारोंबरोबर काम केलं, सगळेच येतील आठवणी सांगत तर तू काय आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणार आहेस?" किरीटच्या बोलण्यावर निशांत काही न बोलता मान हलवत राहिला. तेव्हा किरीटच पुढे म्हणाला, "पूर्ण विचार तरी केलास का? एक नाही, किती अडचणी आहेत त्यात. एक तर आजकाल त्यांचं नावही फारसं कोणी ऐकलं नसेल. कास्टला फक्त हिरोहिरॉईनमुळेच नाही वजन येत, लोकं बाकीची मंडळी कोण आहेत हेही पारखून घेतात. आणि काय रे, नाटकाचे प्रयोग काय फक्त मुंबईत, ते सुध्दा त्यांच्या घराजवळच होणार आहेत का? गावोगावचे दौरे करतांना आमची दमछाक होते, तर या बाई कश्या काय फिरतीवर येऊ शकणार, सांग?"

त्याने अडचणींचे पाढे वाचायला सुरूवात केली तशी निशांत अधिकाधिक विषण्ण होत गेला. किरीटचं बोलणं अजून पूर्ण झालं नव्ह्तं. "सीमाताईंबरोबर लेखी करार झाला नसेल, पण त्यांनाच या भूमिकेसाठी घ्यायचं ठरलं होतं ना? त्यांनाही ते माहित आहे. आता त्यांना डावललं तर चिडणार नाहीत त्या? आपल्या, सध्या चालू असलेल्या 'मांडवावरची वेल' मध्येही त्याच आहेत, त्यांना नाराज करून कसं चालेल? आणि, हे विसरलासच कां, आपल्या रोजच्या तालमींसाठी त्यांच्या घराइतकं मोठं आणि रिकामं घर कुठे मिळणार आहे? त्या नाटकात नसल्या तर काय आपल्याला घर असंच वापरू देतील?"

निशांतने मोठा उसासा टाकला. "काही तरी मार्ग तर काढायला लागणार," तो विचार  करत म्हणाला, "असं केलं तर? कुमुदिनीबाईंना इथले प्रयोग देऊ आणि बाहेरगावच्या प्रयोगांना सीमाताईंना ….म्हणजे त्यांनाही नको वाटायला….."
"अरे माझ्या शहाण्या राजा," किरीट आता पुरता वैतागला होता. या खेपेस तो हक्काने बोलत होता कारण या त्यांच्या महत्वाकांक्षी नाटकाचा तो  फक्त नायकच नव्ह्ता तर निर्मितीतही भागीदार होता. "सीमाताई म्हणजे काय कुक्कुलं बाळ आहेत का एवढंही न समजायला? नाव, प्रसिद्धिचा मोठा वाटा मिळतो इथे….दौर्‍्यांमध्ये श्रम जास्त….हे सगळं माहित असूनही त्या ऐकून घेतील का तुझी ही खुळी स्कीम?"

आणि झालंही तसंच! सीमाताई ऐकून घ्यायला तयारच नव्हत्या. "अरे काय हे निशांत! असं कधी झालयं कां?" निशांत त्यांच्याहून वयाने लहान होताच आणि त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनाखालीही सीमाताईंनी काम केलं होतं, त्यामुळे त्या बोलण्यात सूट घेऊ शकत होत्या. "आणि तू अशी अपेक्षा करतोस कि मी या प्रस्तावाला मान्यता द्यावी?"

"जरा समजून घ्या ना तुम्ही," निशांत अजीजीने म्हणाला, "मी ही जरा दुविध्यातच सापडलोय. त्यांना नाही कसं म्हणायचं या संकोचाने मी हो म्हणालो खरा, पण….तसं पाहिलं तर मला नाही वाटत त्या खरोखरच प्रयोगात काम करू शकतील. एक तर वय एवढं झालयं, पासष्ट तरी असतील. पुन्हा तालमींच्या तणावाची, मेहनतीची सवयही नाही राहिली," त्याच्या मते सीमाताईही पन्नास पंचावन्न पेक्षा कमी नव्हत्या, तेव्हा त्याने सीमाताईंनाच विचारले, "तुम्ही तर सातत्याने रिहर्सल्स, प्रयोग करत असता, सराव आहे. तरीसुध्दा ही सर्व धावपळ सहज शक्य नाही ना, दमायला तर होतच ना? त्यांनी तर कित्येक वर्षात ना तालमी ना प्रयोग केलाय. कसं झेपेल त्यांच्या वयाला, तब्येतीला? थोड्या आठवड्यांतच स्वतःहूनच, मी नाही करू शकत, हेच म्हणतील. थोड्याच वेळाचा प्रश्न आहे ……"


"पण मुळात हा निरोप धाडलाच का त्यांनी?" आत्तापर्यंत गप्प राहिलेला किरीट जरा चिडूनच म्हणाला, त्याला त्याच्या प्रथम निर्मितीमध्ये कसलीही बाधा नको होती, "त्यांच्या काळात त्यांनी एवढ्या नाटकांचे केले तेवढे  प्रयोग पुरेसे नाही झाले का त्यांना? अजून हौस बाकी आहे की काय?"

"तसं नाही रे…." बोलावं कि नाही अश्या दबल्या आवाजात निशांत म्हणाला, "मला वाटतं त्यांची आर्थिक अडचण असावी."
"हं, असेल. त्यांना मूलबाळ, मागेपुढे कोणी नाही," सीमाताईंनी पुस्ती जोडली.
"ठीक आहे ना मग," किरीट्पाशी उपाय तयार होता, "प्रयोगाच्यावेळी त्यांच्या नावाने पेटी फिरवू या प्रेक्षकांमध्ये. त्यांची आठवण ठेवणारे अजूनही असतील. भरपूर जमतील ……" सीमाताई एकदम स्तब्ध झाल्यासारख्या वाटल्या. निशांत मान हलवत म्हणाला, "तसं नाही करता येत ….. त्या घेणारही नाहीत…."

असं सगळंच त्रिशंकू होऊन राहिलं होतं. हो ना करता करता तालमींना सुरूवात झाली. सीमाताईंना सगळ्यांनी सांगून समजावून कसंबसं तयार केलं होतं. त्यामुळे त्याही हजर असत. तालमींसाठी आपलं घर मिळावं यासाठी सर्व आपल्याला इतकं राजी करताहेत असं त्यांना वाटलं असलं तरी त्यांनी तसं दाखवलं नाही.

पहिल्याच दिवशी कुमुदिनीबाईंनी तालमीला आल्यावर प्रथम स्वतःची ओळख करून दिली. "तुमच्यातले बरेच मला ओळ्खतही नसतील. मी जेव्हा स्टेजवर काम करत होते तेव्हा तुमच्यातले अर्धेअधिक जन्मलेदेखील नसतील. हा निशांत तर एवढासा होता," त्यांचे एवढे बोलून होईपर्यंतच सर्वांच्या चेहर्‍यावर कंटाळा दिसत होता. "म्हणून ओळख करून देण्याची गरज आहे. मी कुमुदिनी, पण सगळे मला माईच म्हणतात. तुम्हीही म्हणा – कारण आता आपण सगळे मिळून एका मोठ्या कुटुंबासारखेच, होय कि नाही?" नायिकेची भूमिका करणार्‍या रम्याने तर ह्यावर डोळेच वर फिरवले.

माई पासष्ट वर्षांच्या होत्या, तेवढं वय दिसतही होतं. पण वयामुळे आपण कुठल्याही कामात संथ किंवा पाठी पडलोय असं वाटू न देण्याची त्या काळजी घेत होत्या. वयानुसार आणि आता जास्त लक्ष न दिल्यामुळे शरीर जरा सुटल्यासारखे झाले होते. विरळ होत चाललेले केस रंगवून काळे केले होते, पण त्याने वय लपत नव्ह्ते. एके काळी सुंदर असावा अशी लक्षणे दाखवणारा चेहरा आता ओढलेला, डोळे थकलेले दिसत होते. पण तरीही त्या प्रत्येक कामात उत्साह दाखवत होत्या आणि त्याने सगळी मंडळी अजूनच वैतागत होती.

माईंचं घर तालमीच्या जागेपासून, म्हणजे सीमाताईंच्या घरापासून फारसं दूर नव्ह्तं. त्यामुळे त्या एकट्या रिक्षानेही येऊ शकत. पण जर का सर्वच आपापल्या कामानिमित्ताने शहराच्या दुसर्‍या टोकाला असतील आणि म्हणून रिहर्सलही तिथेच कुठे केली गेली, तर मात्र त्यांच्या येण्याचा प्रश्नच नसे. किरीटला तेवढे कारणही पुरे, "अश्या कधी तालमी होतात का? कोणा एकाच्या सोयीप्रमाणे ……खरं सांगायचं तर, म्हणजे त्यांच्याच भल्यासाठी म्हणतोय मी, त्यांच्यासाठी सिनेमाच उत्तम राहिल. त्यात महिना महिना तालमी नाहीत, प्रयोगांसाठी प्रत्यक्ष उभं राहायचं नाही. त्यांच्या सोयीनुसार शूटींग करता येईल. दमायला झालं, तब्येत ठीक नसेल, तर बसता येईल थोडा वेळ, तोवर दुसर्‍यांचे शॉट्स घेता येतात. सिनेमाच बरा त्यांच्यासाठी." त्याच्या ह्या बोलण्यात काही खोट नव्हती, त्यामुळे निशांत म्हणाला, "तू म्हणतोस ते खरं, पण सिनेमा क्षेत्रात काही त्यांची ओळख नाही. जे काही काम केलं ते स्टेजवरच….घेऊ सांभाळून जसं जमेल तसं."पण किरीट जराही जमवून घ्यायला तयार नव्ह्ता. माई त्याच्याच आईची भूमिका करणार होत्या आणि किरीटचं वागणं असंच राहिलं तर कसं होणार याची निशांतला चिंता लागली होती.

 तसे सर्वच जरा कंटाळ्ले होते. तालमीच्या वेळी माईंनी, आमच्या वेळी ना हे असं होतं, वगैरे काही सुरू केलं कि सगळे 'ओह नो!' म्हणून कपाळाला हात मारायचं तेवढं बाकी ठेवत होते. कधी त्यांच्या लक्षात आलेच तर, 'तुम्हा लोकांना काही नवीन आयडीयाज मिळू शकतील, म्हणून सांगत होते,' असं काहीसं पुट्पुट्त गप्प होत. सवय नसल्याने त्या नक्कीच दमत असणार, पण तरीही खालचा ओठ दाताखाली दाबत, प्रत्येक सीनसाठी उठून उभ्या राहात. कामात कुठलीही कमी न होऊ देण्याची दक्षता घेत.
सर्वांनीच गृहीत धरलं होतं कि माई फार काळ एवढी मेहनत करू शकणार नाहीत. पण तरीही त्या नेमाने येत राहिल्या, तेव्हा मात्र सर्वांचा धीर संपत आला. बारीक सारीक वागण्यातूनही इथे तिथे नाराजी प्रकट होऊ लागली.

त्या दिवशी मात्र एरवीच्या थंड प्रकृतीच्या निशांतच्या चेहर्‍यावरचा उत्साह पाहूनच उमगत होता. "सुटलो, आपण सगळेच सुटलो!" त्याने सर्वांनाच उद्देशून घोषणा केली, "माईंचा फोन आला होता, त्या येऊ शकत नाहीत म्हणून …..आज नाही आणि यापुढेही नाही --" सगळयांनी एकत्रित सुटकेचा निश्वास टाकला. आता सर्व काही ठीक होतं.


"त ….तुम्ही इथे कशा?" सीमाताईंना आपल्या दारात पाहून माई थक्कच झाल्या. सीमाताई फक्त हसल्या. माईंना त्यांना आत बोलावायचंही भान राहिलं नाही. जुन्या पध्दतीच्या दिवाणखान्याकडे, सामानाकडे पाहात सीमाताई आत येऊन बसल्या. "मी इथे कशी विचारता? मी तुम्हाला न्यायला आले आहे – रिहर्सल्ससाठी."
"नाही, नाही!" माई इतक्या पट्कन बोलल्या कि त्यांनी जे बोलायचं त्याची आधीच तयारी करून ठेवलेली असावी. "मी नाही …..म्हणजे मी ….मला ह्या वयात आता जमणार नाही. होत नाही माझ्याच्यानं ……"

"काय सांगता! व्यवस्थित सगळं जमत होतं…..आणि तुम्हालाही ते माहित आहे." सीमाताई समजावत राहिल्या आणि माई  नाही म्हणत राहिल्या. "नाटक – त्याच्या तालमी नि प्रयोग – सगळंच मेहनतीचं काम. पासष्ट वर्षांच्या म्हातारीला झेपण्यासारखं नाही. माझ्यासारखीनं सिनेमात काही मिळालं तर बघायला हवं – रीटेक घ्यायची सोय असते, मध्ये आरामही करता येणं शक्य असेल ….." आता सीमाताईंची खात्री पटली. त्यांना – आणि सर्वांनाच – शंका होती कि माईंबद्दल जे बोललं जातं ते त्यांच्या कानापर्यंत पोहोचत असावं. खरोखरच त्यांना ते कळत होतं, आणि तेच कारण होतं त्यांनी काम सोडण्याचं. पण सीमाताई बोलून दाखवू शकत नव्हत्या.

"तुम्हालाही माहित आहे माई, तुम्हीही हे अनुभवलं असणारच. एकदा स्टेजवर उभं राहिलं कि असतील नसतील त्या शरीराच्या व्याधी कुठच्या कुठे पळून जातात. स्टेजवर नारळ फुटला, लाईट्स लागले, अगरबत्यांचा सुगंध पसरला कि अंगात ताप आहे का दुखणं, तेही विसरायला होतं……."
सीमाताईंनी असं चित्र उभं केलं कि माईही क्षणभर स्तब्ध झाल्या. मग म्हणाल्या, "मला एक सांगा …..मला हे कळत नाही कि तुम्ही का इतका जोर देताहात कि नाटकात मी परतून यावं? तुमचा काय फायदा त्यात? उलट तुमची भूमिका मी – हडपली, तुम्ही तर खुश व्हायला हवं मी हे काम सोडल्याने. म्हणून स्पष्टच विचारते, हा मला परत बोलावण्याचा दिखावा तुम्ही का करता आहात?"

माईंचा रागाने बोलण्याचा हेतू सफल झाला कारण त्यांचा शेवटचा प्रश्न सीमाताईंना झोंबला असावा असं दिसलं. तरीही त्या तसं न दाखवता क्षणभर गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, "आहे, माझा खूप फायदा आहे," सीमाताई बोलल्या, "आता तुम्ही विचारलत म्हणून मी ही स्पष्टच सांगते – तसं पाहिलं तर आपली नाटकाची दुनिया म्हणजे सावल्यांचा खेळ असतो. मला …. मला तुमच्यात माझ्या भविष्याची पडछाया दिसते.  माझीही आता प्रसिध्दीझोतात फारशी वर्षे शिल्लक राहिली नाहीत. हळू हळु काम – आणि उत्पन्नही कमी होत जात बंद होईल. तुम्ही जो आता धडपड करून स्वतःच्या पायावर उभं राहाण्याचा आत्मसन्मान दाखवत आहात, तो मला डोळ्यात, मनात साठवून ठेवायचा आहे. म्हणजे ….जेव्हा माझी पाळी येईल, तेव्हा मला ह्याच तुमच्या आठवणी असेच प्रयत्न करत राहण्याची हिम्मत देतील, धैर्य देतील. याची जरूरी भासेल मला, आता नाही तर थोड्या वर्षांनी ……"


"नाही, असं म्हणू नका," माई आवाजातला कंप लपवत म्हणाल्या, "माझ्यासारखी परिस्थिती कुणावरही न येवो. माझं नात्यागोत्याचं कुणी नाही – अर्चना आहे, पण खरतर ती माझी कुणी नाही. माझ्या जुन्या शेजार्‍यांची मुलगी. पण पोरीनं इतका लळा लावला कि आईवडिल इथलं घर सोडून नवीन घरात गेले, तर ही चार दिवसातच आपलं सामान बांधून परत आली आणि तेव्हापासून माझ्या घरातच राहिली. सगळे खर्च आपल्या पगाराने चालवीन म्हणते, पण मला नाही ते बरं वाटत. जेव्हा माझी सारी पुंजी संपली तेव्हा – हा पुन्हा काम शोधायचा उपद्व्याप केला. पण तुम्ही का पुढची चिंता करता? तुम्हाला तर स्वतःची  मुलंबाळं आहेत ना?"

"एकच मुलगी आहे. लग्न होऊन परदेशात स्थायिक आहे. ती सांभाळेलही. पण मला ते नकोय. म्हणजे – जावयाचे उपकार कशाला घ्या, असं काही नाही. मुलगी असो वा मुलगा, जमेल तितकं आत्मनिर्भर राहाणंच पसंत करीन. पुढे नाईलाजाने पूर्ण अवलंबून राहावच लागलं तर काही करता येत नाही. पण जितकं होईल तितकं ….. म्हणून तुमच्याकडून हे शिकायचं आहे. तेव्हा तुम्ही परत येणार आहात !"

सीमाताईंनी जेव्हा निशांतला 'माई परत येणार' हे सांगितलं, तेव्हा त्याला हसावं का रडावं ते कळेना. "तुम्ही का त्यांना भरीस पाडून बोलावून घेतलत? चांगल्या गेल्या होत्या स्वतःहूनच. आता तुमचीच भूमिका जाईल…." तो वैतागून म्हणाला.
"माझी भूमिका हा माझा प्रश्न आहे ना? आणि तुला खरंच वाटतं कि त्या स्वतःहून गेल्या होत्या?" सीमाताईंनी टोकदार प्रश्न विचारला. त्याचं सरळ उत्तर न देता निशांत पुट्पुटला, "पण आता सगळंच पुन्हा …." निशांतला त्याच्या तालमींमध्ये, प्रयोगांमध्ये अस्थिरता नको होती. माईंविषयीच्या नाराजीने अर्धेअधिक कलाकार मनमोकळा अभिनय करत नव्ह्ते, असं त्याचं मत होतं. पण सीमाताईंचं म्हणणं पडलं कि इतरांनीही सामावून घ्यायला शिकायला हवं. कोणा एकाचा किंवा एका गटाचा हेका चालवून घेणं हेही बरोबर नाही ना?

तेव्हा काही न सुचून निशांत म्हणाला, "पण माईंनीही समजून वागायला पाहिजे ना? कधी त्या त्यांच्या पध्द्तीच्या अभिनयावर जातात. असा काहीतरी मेलोड्रामा करून माझ्या नाटकाचा विचका करतील ……"
"अरे मग तू दिग्दर्शक कोणत्या कामाचा?" सीमाताईंनी त्याची थट्टा केली, पण मग गंभीर होत म्हणाल्या, "खरं सांग, तुला असं खरंच वाटतं कि त्या, त्यांचा अभिनय तुझ्या नाटकाचा बेरंग करतील?" निशांत गप्प राहिला.

धुसफुस झाली, चिडचिड झाली, पण कुठेतरी सगळ्यांना आपल्या तुसड्या वागण्याच्या जाणीवेची शरमही वाटली असावी. माईही बदलल्या होत्या. आता त्या आपलेपणाच्या उमाळ्याने सर्वांशी प्रत्येक बाबतीत बोलत राहण्याचा उत्साह दाखवत नव्ह्त्या. निशांत बोलावेल तेव्हा, सांगेल तसं नि तेवढंच काम करीत आणि पुन्हा आपल्या कोपर्‍यात काही पुस्तक वाचत बसत. त्यामुळे कोणाला फारश्या तक्रारीला जागा राहिली नव्ह्ती.


पहिल्या प्रयोगाचा दिवस आला. सगळ्यांसाठीच ती तणावाची वेळ होती. पण खास करून माईंसाठी. सीमाताईही आल्या होत्या. प्रयोगासाठी त्या सर्वांनाच – आणि माईंना – भेटायला, शुभेच्छा द्यायला रंगपटात गेल्या. इतक्या नाटकांचे प्रथम प्रयोग केलेल्या माईंसाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती कि त्यांना प्रोत्साहनाची गरज असावी. परंतु मध्यंतरी बराच खंड पडल्यानंतर त्यांची ही पुन्हा नव्याने सुरूवात होती. सीमाताईंनी माईंचे हात हातात घेऊन काही न बोलता नुसते थोपटले, माईंसारख्या मुरलेल्या अभिनेत्रीला त्या काय बोलणार?

प्रथम प्रयोग पार पडला – नुसता पार नाही पडला, तर अत्युत्तम रित्या संपन्न झाला. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी थिएटर डोक्यावर घेतलं. कुमुदिनीबाईंच्या अभिनयाला विशेष प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्या अभिवादनासाठी पडद्या बाहेर आल्या तेव्हा सर्वांनी उभं राहून त्यांना मान दिला.

माई थकून रंगपटात येऊन बसल्या. सगळेच आनंदात एकमेकांना टाळ्या देऊन, पाठीवर थाप मारून वाहवा करत होते. निशांत माईंसमोर आला. त्यांच्या समोर गुडघ्यावर बसून त्याने हात जोडले. "काय बोलू माई? शब्द नाहीत. गाजवलत तुम्ही!" दोघेही आपापल्या डोळ्यांतले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होते.
"अरे बाबा, तुझ्या अपेक्षेत मी उणी तर पडले नाही ना? मला तीच चिंता होती." माई थरथरत्या आवाजात म्हणाल्या. "नाही माई, उलट मीच – कधी कामाच्या तापात अधिक उणं बोललो असेन तर माफी मागायला आलो आहे." निशांत बोलला.

स्टेजच्या पाठी, ग्रीन रूममध्ये सर्वत्रच एक जल्लोष चालला होता. या प्रयोगासाठी बरेचसे खास आमंत्रित आले होते. ते आता पाठी येऊन सर्वांचं अभिनंदन करत होते. मिठाई मागवली गेली. सगळी एकच गडबड उडाली होती.
सीमाताई जराश्या दूरच थांबल्या होत्या, आपल्या परिचितांशी बोलत होत्या. गर्दी ओसरल्यावर त्या ग्रीनरूममध्ये गेल्या. सगळी मंडळी बाजूच्या खोलीत पार्टी करण्यात गुंतली होती. ग्रीनरूममध्ये माई एकट्याच एका कोपर्‍यात डोळे मिटून बसल्या होत्या. चेहरा श्रांत दिसत होता, पण त्यावर एक समाधानही होतं. सीमाताईंच्या चाहुलीने त्यांनी डोळे उघडले.

"माई, मी तुम्हाला काय बोलणार?" त्यांचा हात हाती घेत सीमाताई म्हणाल्या, "अप्रतिम होता तुमचा अभिनय!"
"तुम्ही जोर दिला नसता तर शक्य झालं नसतं," माईंनीही लगेच पोच दिली, "तेवढ्यानेही झाले नाही, पुढची दारेही उघडली," सीमाताईंचा प्रश्नार्थक चेहरा बघून त्यांनी खुलासा केला, "आमंत्रितांमध्ये जीवन सामंत होता. माझ्याबरोबर नायकाचं काम करणार्‍्या शरद सामंतांचा मुलगा, आता सिनेमा दिग्दर्शक आहे म्हणे. इथे मला भेटायला येऊन त्याच्या पुढच्या दोन चित्रपटात काम देऊ केलं. उद्या येऊन करार करणार आहे. मी माझ्या दमानं, तब्येतीनं काम करू शकेन आणि रोजीरोटीही मिळेल. बाई, मला अपेक्षा नव्ह्ती ते मिळालं आणि ते तुमच्यामुळे. ही भूमिका नेहमी तुमचीच होती, आता तुम्हीच करा. निशांतने गळ घातली कि एवढी मेहनत घेतलीय तुम्ही तर निदान पाच प्रयोग तरी करा. म्हणून तेवढे करीन. त्यानंतर संपूर्णतः तुम्हीच……"

"मला बाहेरगावचे प्रयोग ठीक आहेत, सिनेमाचं काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत तुम्हीच …." पण सीमाताईंचं वाक्य माईंनी पूर्ण करू दिलं नाही. "नाही. ठरलं ते ठरलं. पाहा, आपण भविष्याची चिंता करत होतो, पण तुम्ही हट्टानं मला परत घेऊन गेलात, आता माझ्या भविष्याची काळ्जी थोडी तरी मिटली. तुम्ही हे जे निरपेक्षपणे केलंत, माझी खात्री आहे – तुमच्याही पुढच्या काळात कुठल्याही सावल्या नाही भेडसावणार तुम्हाला ……."
सीमाताई काही बोलू शकल्या नाहीत, त्यांनी फक्त मान डोलावली. दाटल्या कंठाने दोघी हात धरून निःशब्द बसून राहिल्या.

                                                                                 समाप्त
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------