Tuesday 25 August 2015

अबोली





  अबोली

"काय सुमंतराव, कसल्या विचारात हरवलात?" इन्स्पेक्टर रोकेंचा प्रश्न ऐकून सुमंत जरा चपापला आणि आत लॉक अपच्या दिशेने जाणार्‍या पॅसेजकडे सहजच नजर गेली होती असे भासवू लागला. तेव्हा रोकेच पुन्हा म्हणाले, "आहे, पोरगी गोड आहे, कबूल. पण शेवटी चोर ती चोरच ना? पोलिसांना चोरांबद्दल सहानुभूती ठेवून कसं चालेल, सांगा."
            "नाही हो, वाटत नाही ती चोर असावी असं," सुमंत जरा कळवळून म्हणाला, "विचारलं तर सारखं एकच म्हणते, मी चोरी नाही केली. पुन्हा, सुशिक्षित आहे, कॉलेजात शिकते. आणि खरोखरच, चोरी करू शकेल अशा बदमाष टाईपची नाही दिसत ती. . . ."
            "सगळे चोर एकच म्हणतात, मी चोरी नाही केली. आपली चोरी कबूल करणारा कोणी चोर बघितला आहे का आतापर्यंत?" रोके उसासा टाकत म्हणाले, "सरळ सरळ ओपन अ‍ॅन्ड शट केस आहे ही. भरपूर पैसेवाल्यांचं घर, स्वयंपाकाला येणारी गरिबाघरची मुलगी, कुठल्याश्या राजघराण्याकडून लिलावात घेतलेला पुरातन, अनमोल रत्नजडित हार बघितला, मोह झाला नि चोरी केली. चोरीचा हार तिच्या घरात मिळालाही, अजून काय हवंय? केस शट!"
            "ते सगळं खरं, पण तरीही . .  .कुठेतरी, काहीतरी बरोबर नाही असं वाटत राहातं. . ." सुमंत आपल्याच विचारात हरवल्यासारखा बोलला.
            "हं. . . .तसं थोडसं वाटतं खरं…" इन्स्पेक्टर रोके जरा गंभीर होत म्हणाले, "ते मि. समेळ, ज्यांनी आपल्या चोरीची तक्रार नोंदवली, ते तिच्याशी बोलायला आले होते, मदत ऑफर करत होते, जामिनाची व्यवस्था करू का, कोणी वकील शोधून देऊ का वगैरे विचारत होते. तर ही एक शब्दही बोलायला तयार नाही, गांगरून, बावरून टाळायलाच बघत होती. . . "
            "हे मला नव्हतं माहित!" सुमंत एकदम सतर्क होत म्हणाला. त्याची ही अचानक रिअ‍ॅक्शन बघून रोके मस्करी करण्याची संधी घेत, डोळे मोठे करत म्हणाले, "माहित असतं तर काय केलं असतं? तिला तिथल्या तिथे 'बाइज्जत रिहा' वगैरे केलं असतं का?"
            "तसं नाही…." सुमंत जरासा शरमला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, "पण तुम्हीच सांगा, हे जरा विचित्रच नाही कां? जे चोरीची तक्रार नोंदवतात, तेच स्वतः, चोर पकडला गेल्यावर चोराला मदत करायला येतात! काहीतरी गडबड नाही वाटत?"
            "अगदी तसंच काही नाही," रोके समजावण्याच्या सुरात म्हणाले, "चोरी झाली म्हणून तक्रार केली, त्यांचा माल मिळाला, त्यांचं काम झालं. पण ती मुलगी त्यांच्याच घरात स्वयंपाकाचं काम करत होती तेव्हा माणूसकीच्या नात्यांनं मदत विचारली तर त्यात काही वावगं तर नाही वाटत. . ."
            "मला नाही पटत," सुमंत मान हलवित म्हणाला, "एकतर ती काहीच बोलायला तयार नाही, पण तिची एकूण देहबोली, तिचा भाव यावरून वाटत कि ती निर्दोष असावी. तिला जेव्हा अटक केली तेव्हा काय एक दोन वाक्य बोलली तेवढीच….ती म्हणाली होती, त्यांच्या घरात दरवाज्यातून पॅसेजमधून सरळ किचन एवढेच तिचे जाणे येणे होते. बाकीचं घर, इतर खोल्या, कुठे अलमारी नि त्यात कुठे दागिने ठेवत ते सुध्दा तिला ठाऊक नव्हते, तर चोरीचा प्रश्नच कुठे येतो. त्यात घरमालकांचं असं मदत विचारणं ….."
            "पण त्यानं काहीही सिध्द होत नाही सुमंत," रोके स्थिर आवाजात म्हणाले, "पुरावा हवा कि ती निर्दोष आहे ….. म्हणजेच, दुसरं कुणीतरी गुन्हेगार आहे हे सिद्ध व्हायला हवं, तरच……."

सब इन्स्पेक्टर सुमंत पाटीलचे विचार काहीतरी मार्ग शोधण्यासाठी धावू लागले. रोकेसाहेबांनी कितीही थट्टा केली तरीही त्याचं म्हणणं खोडून काढलं नव्हतं किंवा ह्या केसवर पुढे काम करायची गरज नाही, केस बंद झाली असं म्हणून त्याला पाठी खेचण्याचाही प्रयत्न केला नव्हता. तेवढंही त्याला पुरेसं होतं.

त्याने अबोलीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती काढण्यापासून सुरूवात केली. तिचं नाव अबोली नाही, श्रुती आहे हे त्याला माहित होतं, पण ती प्रत्येक प्रश्नावर इतकी गप्प राहायची कि त्याच्यामते ती अबोलीच होती. राहायला गरीब वस्तीत, वडील नव्हते, आई चार घरी धुणंभांडी वरकाम करून जेमतेम घर चालवायची. मोठा भाऊ असून नसल्यासारखा, कुठेतरी परागंदा असायचा, कधी धूमकेतू सारखा उगवायचा. हिला शिकायचं होतं, म्हणून दोन तीन घरी स्वयंपाकाचं काम करून फीचे आणि आपल्या खर्चाचे पैसे कमावून कॉलेजात शिकत होती.

            ज्या इतर दोन घरी ती काम करायची, तिथे सुमंतने चौकशी केली. एका घरी, आम्हाला काहीच माहित नाही, असं म्हणून दरवाजा बंद करायची घाई केली. त्यांना पोलिसांच्या भानगडीत पडायचं नव्हतं, हे स्पष्ट होतं. दुसर्‍या बाई, ज्यांच्या घरी चोरी झाली त्या समेळांइतक्या श्रीमंत नव्हत्या. तेव्हा त्या पैश्याच्या दबावामुळे किंवा श्रीमंतांना खोटं कसं पाडायचं या विचाराने, त्यांच्याप्रमाणेच बोलू पाहात होत्या, पण त्याच वेळी श्रुतीला एकदम चोर म्हणायलाही धजावत नव्हत्या. "स्वभावाने अगदी गरीब, साधी मुलगी हो," त्यांच्या आवाजात जरा कळवळा होता, "येऊन चुपचाप आपलं काम करून जायची, कुणाच्या अध्यात ना मध्यात, ना उगाच जास्तीची बडबड. वयानं एवढी लहान, पण हाताला चव किती!" मग आपण उगाचच जास्त तर बोलत नाही ना ह्या भीतीने त्या बाई घाईघाईने म्हणाल्या, "पण आजकाल कुणाचं काही सांगता येतं का? कोण हमी देणार हो?" म्हणजे तिथेही पुढे रस्ता बंद!

केसमध्ये नमूद केलं  होतं कि श्रुतीला त्या उच्चभ्रु इमारतीत नोकरी लावली होती तिथल्या दरवानाने. सुमंतने त्या दामूकाकाला चौकीवर बोलावून घेतलं. ह्या आधीही त्याला बोलावून प्राथमिक विचारणा वगैरे झाली होती, पण चोरी सिध्द झाल्यानंतर पुढे काही चौकशीची जरूर पडली नव्हती. तो त्या मुलीच्याच वस्तीत राहणारा नि तिला, तिच्या आईला चांगलं ओळखणारा होता, नेहमीचं जाणं येणं होतं. 

पुन्हा चौकीवर बोलावल्यानं जरा बिथरून गेल्यासारखा वाटला, "आता पुना का? झालं ना सगळं?" तरीही सुमंतने शांतपणे विचारायला सुरूवात केली. "अवं, आता काय पुना पुना सांगणार?" वयस्कर दामू हात उडवून कावल्यासारखा बोलू लागला, "चूक केली, मोठी घोडचूक केली त्या पोरीला कामाला लावून. तिची आई मला बहिणीसारखी, चांगला घरोबा आमचा. हिला मदत करायला गेलो तर नाकच कापलं की माझं. . . " त्याचा वैताग समजण्यासारखा होता, पण सुमंतला एक गोष्ट जाणवली कि तो नजरेला नजर देऊन बोलायचं टाळत होता. चौकीवर बोलावून पुन्हा विचारपूस केल्याने बावरलाही असेल, पण तरीही त्याची सुमंतच्या मनाच्या कोपर्‍्यात कुठेतरी नोंद झाली.

इन्स्पेक्टर रोके अधून मधून चौकशी करत होते. त्यांनीच सुचविले कि समेळांची पार्श्वभूमी तपासून पाहावी. सुमंतच्या तपासातलीही पुढची पायरी तीच होती. मोठ्या कंपनीत परचेस विभागात अगदी वरच्या हुद्दयावर, वरची, आजूबाजूची कमाई भरपूर. त्यामुळे अगदी सुखवस्तू. शोभेशी पत्नी, दोन मुलं – मोठी मुलगी परदेशात उच्च शिक्षणासाठी गेली होती, तर धाकटा मुलगा उटीच्या बोर्डींग स्कूलमध्ये शेवटच्या वर्षाला होता. कसं छान चित्र होतं. पण जरा जास्त खोलात गेल्यावर त्या चित्राचे वेगवेगळे रंग दिसू लागले.

इतकी कमाई असूनही समेळांना कर्जही बरंच होतं, आणि अलिकडे ते वाढत चालल्याचं दिसत होतं. एकतर उच्च राहाणी, त्यातूनही इतर बरेच खर्च. इतक्या वरच्या हुद्दयावरचे साहेब म्हंटल्यावर कोणी उघड उघड चर्चा करत नव्हते, पण एकंदरीत त्यांच्या हाताखाली काम करायला ऑफिसातल्या तरूणींची तयारी नसे. तसे अगदीच रानटी पशुवृत्ती दाखवत असे नाही, पण मुलींवर बरेच पैसे खर्च करून, मोठमोठ्या भेटी देऊन त्यांना वश करायचा नेहमीच प्रयत्न जारी. त्यामुळे पैशांची कमी, ती भरून काढण्यासाठी जुगार - रेस, त्यात अजूनच कर्ज. असा सगळा प्रकार होता.
जश्या जश्या चौफेर चौकश्या पुढे सरकत गेल्या तशी सुमंतच्या विचारचक्रांना गति मिळू लागली. एका दुपारी सुमंतला आपल्या दारात पाहून मिसेस शोभा समेळांना आश्चर्यच वाटलं. त्याच्याबरोबर त्याच्याच वयाचा दुसराही एक तरूण होता. या, बसा झाल्यानंतर सुमंत म्हणाला, "हा चिराग, माझा मित्र आहे. ज्वेलरी डिझाईन करतो. ह्या केसबद्दल ऐकलं तेव्हापासून त्याला तो अ‍ॅन्टिक नेकलेस बघायची खूप इच्छा आहे. तसदी होणार नसेल तर जरा पहायला मिळेल का…..?"
 समेळबाईंनी अतिउत्साहाने आत जाऊन तो हार आणला. ही केस झाल्यापासून त्या नेकलेसची बरीच जाहिरात झाली होती आणि त्यांना खूपच भाव मिळत होता. त्यामुळे त्या तश्या खूश होत्या.
चिराग डोळ्याला जवाहिर्‍यांचं भिंग लावून तो नेकलेस निरखेपर्यंत त्या आत चहापाण्याचं बघायला गेल्या. दोन मिनिटातच चिरागने भिंग काढून हार बाजूला ठेवला. सुमंतने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या. चिरागने मान नकारार्थी हलविली. "खात्री आहे तुझी?" सुमंतने दबल्या स्वरात विचारले. "अगदी पूर्णपणे." चिराग हळू पण ठामपणे म्हणाला. तेवढ्यात मिसेस समेळ चहा घेऊन आल्याच, ते दोघेही गप्प झाले.

तपासाच्या साखळीच्या पुढच्या कड्या जुळवणे फारसे मुश्कील नव्हते. चोरीचा उंची माल विकण्याच्या छुप्या अड्ड्यांवर अचानक छापा, दामूकाकाची अगदी खोलात जाऊन उलट तपासणी, अजून एकदोन चौकश्या वगैरे झाल्या आणि सुमंतच्या चेहर्‍यावर जरा समाधान दिसू लागलं.

श्रुतीला मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे आणण्याच्या वेळी केसशी संबंधित सर्वच तिथे उपस्थित होते. केसची कारवाई पुढे सरकण्याआधीच सुमंतने, श्रुतीसाठी दिल्या गेलेल्या वकील सान्यांना खूण केली. "संशयित आरोपी कुमारी श्रुती निर्दोष आहे हे सिध्द करण्याइतके पुरावे पोलिसखात्याने एकत्रित केले आहेत. ते पेश करण्याची परवानगी मिळावी." सान्यांनी अर्जी केली. ती मान्य होताच सुमंतने एकेकाला समोर आणले. 

सुमंतने समेळ्बाईंना सांगितले तसा चिराग डिझाईनर नव्हता तर मान्यता प्राप्त रत्नपारखी होता. त्याने आपल्या साक्षीत स्पष्टपणे सांगितले कि जो हार चोरीचा म्हणून श्रुतीच्या घरात मिळाला आणि तोच जो आता समेळबाईंच्या ताब्यात होता, तो नकली होता. असली हार चोरबाजारातल्या एका दलालाकडून जप्त करण्यात आला होता आणि त्या दलालानेही ते मान्य केले.
थकलेल्या, घाबरलेल्या दामूकाकांनी आपल्या कबूलीजबाबात सांगितले कि त्यांनीच तो हार समेळांच्या दबावाखाली श्रुतीच्या घरात नेऊन लपवला होता, पण दामूकाकांना हे अजिबात माहित नव्हते कि तो नकली हार होता. केस आता स्पष्टपणे पुढे आली होती.

जेव्हा खूपच पैसे हाती होते तेव्हा समेळांनी तो अतिशय किमती हार आपल्या पत्नीला घेऊन दिला होता. पण कर्ज वाढत गेले तशी पैशाची गरज भासू लागली. आपली बायको तो हार किंवा इतर काहीही किमती गोष्टी विकू देणार नाही याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी तसाच नकली हार बनवून घेतला. खरा नेकलेस चोरबाजारात विकून, नकली हार दामूवर दबाव टाकून त्याच्याकरवी श्रुतीच्या घरात लपवला. असं करण्यामागे त्यांचे दोन हेतू होतेः हार मिळाला, चोर पकडला गेला म्हणजे पुढे काही चौकशी होणार नाही आणि खरा हार विकला गेला आहे याचा कोणाला संशयही येणार नाही.

दुसरं म्हणजे श्रुतीला ह्यात अडकवून त्यांना तिचा बदला घ्यायचा होता. समेळांनी तिच्या दिशेने केलेले सारे प्रयत्न तिने धुडकावून लावले होते, त्यांना अजिबात दाद दिली नव्हती ह्याचा त्यांनी मनात डूख धरला होता. पुन्हा, तिला अटक झाल्यावर साळसूदपणे येऊन त्यांनी तिला मदतीची ऑफर केली, म्हणजे ह्या उपकारामुळे तरी ती आपल्या आंगठ्याखाली राहील या हेतूने. असे त्यांनी चोरीच्या एका दगडाने बरेच पक्षी मारण्याचा प्रयत्न केला होता.

तसं पाहिलं तर चोरीची गरजही नव्हती; त्यांना फक्त त्या असली नकली हारांची अदलाबदल करून खरा नेकलेस विकता आला असता. पण पुढे मागे समजा काही प्रसंगाने घरातला हार (पॉलिशसाठी, दुरूस्तीसाठी) दुकानात गेला आणि नकली आहे हे उघडकीस आले तर पूर्ण संशय त्यांच्यावरच आला असता, म्हणून चोरीचा सर्व खटाटोप. याच कारणास्तव तो हार श्रुतीच्या घरात मिळताच ताबडतोब त्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. सुरूवातीला त्यांची सर्व चाल यशस्वीही झाली. पण आता सुमंतने जे पुरावे आणि साक्षीदार पुढे आणले त्यानंतर कोर्टालाही श्रुतीला निर्दोष मान्य करावे लागले.

सुटका झाल्यावर काय बोलावे ते न सुचुन ती भारावल्यासारखी गप्पच सुमंतपुढे उभी राहिली. तेवढ्यात दामूकाका रडतच आले नि तिच्यापुढे हात जोडू लागले, "


 
माफ कर पोरी, मी कधी असं केलं नसतं. पण समेळसाहेबांनी धमकी दिली कि मी त्यांचं ऐकलं नाही तर मला सोसायटीच्या दरवानाच्या नोकरीतून काढून टाकतील. बाकी कुठल्या धमकीला डरलो नसतो ग, पण नोकरी गेली तर दुसर्‍या कामावर कोणी ठेवणार नाही आणि या वयात काय करणार, कुठुन कमावणार आणि पोराबाळांना काय खाऊ घालणार? नाही तर तुझा घात नसता केला कधी……. ह्या धाकट्या इन्स्पेक्टर साहेबांनी वाचवलं मला मोठ्या पापातून!" त्यांचं ऐकता ऐकता श्रुतीच्याही अश्रुधारा सुरू झाल्या.

"पण आता तर सगळं ठीक झालं ना?" सुमंत समजावत म्हणाला. श्रुतीने काही न बोलता नुसती मान डोलावली. "मग आता का ह्या गंगाजमुना?" सुमंतने हैराण स्वरात विचारले, तेव्हा त्या आसवांतूनही तिच्या ओठावर अस्फुट हसु उमलले …… श्रावणसरींतून हलकेच इंद्रधनुष्य फुलावे तसे.
                                                                        समाप्त

No comments:

Post a Comment