Friday 21 August 2015

पडछाया






पडछाया
"अरे निशांत, मी ऐकलं ते खरं का रे? अरे हे आत्मघातकी विचार कधी यायला लागले तुझ्या मनात, अं?" किरीटने अर्धवट थट्टेने, अर्धवट गंभीरतेने विचारले. निशांतने उद्वेगाने आपल्या आधीच विस्कटलेल्या केसांतून हात फिरवला, "ए बाबा, आठवणही नको करून देऊस रे ….."

"अरे, पण मग का हा निर्णय घेतलास? कारण काय?" किरीटनेही आता जरा हैराण स्वरात विचारले, "आपण किती महत्वाकांक्षेने हे नाटक हाती घेतलं. आणि तुला कोणी तरी अडगळीत कोळीष्टकांनी वेढलेली म्हातारीच – सॉरी, प्रौढाच—भेटली का? अरे आईचा रोलही महत्वाचा आहे त्यात……"

"मला माहित नाही का ते?" निशांत खरोखरच वैतागला होता, "अरे, त्यांनी निरोप पाठवला – नात का बाजूची कोणी होती—बाबांच्या बरोबर त्यांनी काम केलं होतं त्याची आठवण वगैरे करून दिली….."
"अरे पण भिसेकाकांनी हजारोंबरोबर काम केलं, सगळेच येतील आठवणी सांगत तर तू काय आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणार आहेस?" किरीटच्या बोलण्यावर निशांत काही न बोलता मान हलवत राहिला. तेव्हा किरीटच पुढे म्हणाला, "पूर्ण विचार तरी केलास का? एक नाही, किती अडचणी आहेत त्यात. एक तर आजकाल त्यांचं नावही फारसं कोणी ऐकलं नसेल. कास्टला फक्त हिरोहिरॉईनमुळेच नाही वजन येत, लोकं बाकीची मंडळी कोण आहेत हेही पारखून घेतात. आणि काय रे, नाटकाचे प्रयोग काय फक्त मुंबईत, ते सुध्दा त्यांच्या घराजवळच होणार आहेत का? गावोगावचे दौरे करतांना आमची दमछाक होते, तर या बाई कश्या काय फिरतीवर येऊ शकणार, सांग?"

त्याने अडचणींचे पाढे वाचायला सुरूवात केली तशी निशांत अधिकाधिक विषण्ण होत गेला. किरीटचं बोलणं अजून पूर्ण झालं नव्ह्तं. "सीमाताईंबरोबर लेखी करार झाला नसेल, पण त्यांनाच या भूमिकेसाठी घ्यायचं ठरलं होतं ना? त्यांनाही ते माहित आहे. आता त्यांना डावललं तर चिडणार नाहीत त्या? आपल्या, सध्या चालू असलेल्या 'मांडवावरची वेल' मध्येही त्याच आहेत, त्यांना नाराज करून कसं चालेल? आणि, हे विसरलासच कां, आपल्या रोजच्या तालमींसाठी त्यांच्या घराइतकं मोठं आणि रिकामं घर कुठे मिळणार आहे? त्या नाटकात नसल्या तर काय आपल्याला घर असंच वापरू देतील?"

निशांतने मोठा उसासा टाकला. "काही तरी मार्ग तर काढायला लागणार," तो विचार  करत म्हणाला, "असं केलं तर? कुमुदिनीबाईंना इथले प्रयोग देऊ आणि बाहेरगावच्या प्रयोगांना सीमाताईंना ….म्हणजे त्यांनाही नको वाटायला….."
"अरे माझ्या शहाण्या राजा," किरीट आता पुरता वैतागला होता. या खेपेस तो हक्काने बोलत होता कारण या त्यांच्या महत्वाकांक्षी नाटकाचा तो  फक्त नायकच नव्ह्ता तर निर्मितीतही भागीदार होता. "सीमाताई म्हणजे काय कुक्कुलं बाळ आहेत का एवढंही न समजायला? नाव, प्रसिद्धिचा मोठा वाटा मिळतो इथे….दौर्‍्यांमध्ये श्रम जास्त….हे सगळं माहित असूनही त्या ऐकून घेतील का तुझी ही खुळी स्कीम?"

आणि झालंही तसंच! सीमाताई ऐकून घ्यायला तयारच नव्हत्या. "अरे काय हे निशांत! असं कधी झालयं कां?" निशांत त्यांच्याहून वयाने लहान होताच आणि त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनाखालीही सीमाताईंनी काम केलं होतं, त्यामुळे त्या बोलण्यात सूट घेऊ शकत होत्या. "आणि तू अशी अपेक्षा करतोस कि मी या प्रस्तावाला मान्यता द्यावी?"

"जरा समजून घ्या ना तुम्ही," निशांत अजीजीने म्हणाला, "मी ही जरा दुविध्यातच सापडलोय. त्यांना नाही कसं म्हणायचं या संकोचाने मी हो म्हणालो खरा, पण….तसं पाहिलं तर मला नाही वाटत त्या खरोखरच प्रयोगात काम करू शकतील. एक तर वय एवढं झालयं, पासष्ट तरी असतील. पुन्हा तालमींच्या तणावाची, मेहनतीची सवयही नाही राहिली," त्याच्या मते सीमाताईही पन्नास पंचावन्न पेक्षा कमी नव्हत्या, तेव्हा त्याने सीमाताईंनाच विचारले, "तुम्ही तर सातत्याने रिहर्सल्स, प्रयोग करत असता, सराव आहे. तरीसुध्दा ही सर्व धावपळ सहज शक्य नाही ना, दमायला तर होतच ना? त्यांनी तर कित्येक वर्षात ना तालमी ना प्रयोग केलाय. कसं झेपेल त्यांच्या वयाला, तब्येतीला? थोड्या आठवड्यांतच स्वतःहूनच, मी नाही करू शकत, हेच म्हणतील. थोड्याच वेळाचा प्रश्न आहे ……"


"पण मुळात हा निरोप धाडलाच का त्यांनी?" आत्तापर्यंत गप्प राहिलेला किरीट जरा चिडूनच म्हणाला, त्याला त्याच्या प्रथम निर्मितीमध्ये कसलीही बाधा नको होती, "त्यांच्या काळात त्यांनी एवढ्या नाटकांचे केले तेवढे  प्रयोग पुरेसे नाही झाले का त्यांना? अजून हौस बाकी आहे की काय?"

"तसं नाही रे…." बोलावं कि नाही अश्या दबल्या आवाजात निशांत म्हणाला, "मला वाटतं त्यांची आर्थिक अडचण असावी."
"हं, असेल. त्यांना मूलबाळ, मागेपुढे कोणी नाही," सीमाताईंनी पुस्ती जोडली.
"ठीक आहे ना मग," किरीट्पाशी उपाय तयार होता, "प्रयोगाच्यावेळी त्यांच्या नावाने पेटी फिरवू या प्रेक्षकांमध्ये. त्यांची आठवण ठेवणारे अजूनही असतील. भरपूर जमतील ……" सीमाताई एकदम स्तब्ध झाल्यासारख्या वाटल्या. निशांत मान हलवत म्हणाला, "तसं नाही करता येत ….. त्या घेणारही नाहीत…."

असं सगळंच त्रिशंकू होऊन राहिलं होतं. हो ना करता करता तालमींना सुरूवात झाली. सीमाताईंना सगळ्यांनी सांगून समजावून कसंबसं तयार केलं होतं. त्यामुळे त्याही हजर असत. तालमींसाठी आपलं घर मिळावं यासाठी सर्व आपल्याला इतकं राजी करताहेत असं त्यांना वाटलं असलं तरी त्यांनी तसं दाखवलं नाही.

पहिल्याच दिवशी कुमुदिनीबाईंनी तालमीला आल्यावर प्रथम स्वतःची ओळख करून दिली. "तुमच्यातले बरेच मला ओळ्खतही नसतील. मी जेव्हा स्टेजवर काम करत होते तेव्हा तुमच्यातले अर्धेअधिक जन्मलेदेखील नसतील. हा निशांत तर एवढासा होता," त्यांचे एवढे बोलून होईपर्यंतच सर्वांच्या चेहर्‍यावर कंटाळा दिसत होता. "म्हणून ओळख करून देण्याची गरज आहे. मी कुमुदिनी, पण सगळे मला माईच म्हणतात. तुम्हीही म्हणा – कारण आता आपण सगळे मिळून एका मोठ्या कुटुंबासारखेच, होय कि नाही?" नायिकेची भूमिका करणार्‍या रम्याने तर ह्यावर डोळेच वर फिरवले.

माई पासष्ट वर्षांच्या होत्या, तेवढं वय दिसतही होतं. पण वयामुळे आपण कुठल्याही कामात संथ किंवा पाठी पडलोय असं वाटू न देण्याची त्या काळजी घेत होत्या. वयानुसार आणि आता जास्त लक्ष न दिल्यामुळे शरीर जरा सुटल्यासारखे झाले होते. विरळ होत चाललेले केस रंगवून काळे केले होते, पण त्याने वय लपत नव्ह्ते. एके काळी सुंदर असावा अशी लक्षणे दाखवणारा चेहरा आता ओढलेला, डोळे थकलेले दिसत होते. पण तरीही त्या प्रत्येक कामात उत्साह दाखवत होत्या आणि त्याने सगळी मंडळी अजूनच वैतागत होती.

माईंचं घर तालमीच्या जागेपासून, म्हणजे सीमाताईंच्या घरापासून फारसं दूर नव्ह्तं. त्यामुळे त्या एकट्या रिक्षानेही येऊ शकत. पण जर का सर्वच आपापल्या कामानिमित्ताने शहराच्या दुसर्‍या टोकाला असतील आणि म्हणून रिहर्सलही तिथेच कुठे केली गेली, तर मात्र त्यांच्या येण्याचा प्रश्नच नसे. किरीटला तेवढे कारणही पुरे, "अश्या कधी तालमी होतात का? कोणा एकाच्या सोयीप्रमाणे ……खरं सांगायचं तर, म्हणजे त्यांच्याच भल्यासाठी म्हणतोय मी, त्यांच्यासाठी सिनेमाच उत्तम राहिल. त्यात महिना महिना तालमी नाहीत, प्रयोगांसाठी प्रत्यक्ष उभं राहायचं नाही. त्यांच्या सोयीनुसार शूटींग करता येईल. दमायला झालं, तब्येत ठीक नसेल, तर बसता येईल थोडा वेळ, तोवर दुसर्‍यांचे शॉट्स घेता येतात. सिनेमाच बरा त्यांच्यासाठी." त्याच्या ह्या बोलण्यात काही खोट नव्हती, त्यामुळे निशांत म्हणाला, "तू म्हणतोस ते खरं, पण सिनेमा क्षेत्रात काही त्यांची ओळख नाही. जे काही काम केलं ते स्टेजवरच….घेऊ सांभाळून जसं जमेल तसं."पण किरीट जराही जमवून घ्यायला तयार नव्ह्ता. माई त्याच्याच आईची भूमिका करणार होत्या आणि किरीटचं वागणं असंच राहिलं तर कसं होणार याची निशांतला चिंता लागली होती.

 तसे सर्वच जरा कंटाळ्ले होते. तालमीच्या वेळी माईंनी, आमच्या वेळी ना हे असं होतं, वगैरे काही सुरू केलं कि सगळे 'ओह नो!' म्हणून कपाळाला हात मारायचं तेवढं बाकी ठेवत होते. कधी त्यांच्या लक्षात आलेच तर, 'तुम्हा लोकांना काही नवीन आयडीयाज मिळू शकतील, म्हणून सांगत होते,' असं काहीसं पुट्पुट्त गप्प होत. सवय नसल्याने त्या नक्कीच दमत असणार, पण तरीही खालचा ओठ दाताखाली दाबत, प्रत्येक सीनसाठी उठून उभ्या राहात. कामात कुठलीही कमी न होऊ देण्याची दक्षता घेत.
सर्वांनीच गृहीत धरलं होतं कि माई फार काळ एवढी मेहनत करू शकणार नाहीत. पण तरीही त्या नेमाने येत राहिल्या, तेव्हा मात्र सर्वांचा धीर संपत आला. बारीक सारीक वागण्यातूनही इथे तिथे नाराजी प्रकट होऊ लागली.

त्या दिवशी मात्र एरवीच्या थंड प्रकृतीच्या निशांतच्या चेहर्‍यावरचा उत्साह पाहूनच उमगत होता. "सुटलो, आपण सगळेच सुटलो!" त्याने सर्वांनाच उद्देशून घोषणा केली, "माईंचा फोन आला होता, त्या येऊ शकत नाहीत म्हणून …..आज नाही आणि यापुढेही नाही --" सगळयांनी एकत्रित सुटकेचा निश्वास टाकला. आता सर्व काही ठीक होतं.


"त ….तुम्ही इथे कशा?" सीमाताईंना आपल्या दारात पाहून माई थक्कच झाल्या. सीमाताई फक्त हसल्या. माईंना त्यांना आत बोलावायचंही भान राहिलं नाही. जुन्या पध्दतीच्या दिवाणखान्याकडे, सामानाकडे पाहात सीमाताई आत येऊन बसल्या. "मी इथे कशी विचारता? मी तुम्हाला न्यायला आले आहे – रिहर्सल्ससाठी."
"नाही, नाही!" माई इतक्या पट्कन बोलल्या कि त्यांनी जे बोलायचं त्याची आधीच तयारी करून ठेवलेली असावी. "मी नाही …..म्हणजे मी ….मला ह्या वयात आता जमणार नाही. होत नाही माझ्याच्यानं ……"

"काय सांगता! व्यवस्थित सगळं जमत होतं…..आणि तुम्हालाही ते माहित आहे." सीमाताई समजावत राहिल्या आणि माई  नाही म्हणत राहिल्या. "नाटक – त्याच्या तालमी नि प्रयोग – सगळंच मेहनतीचं काम. पासष्ट वर्षांच्या म्हातारीला झेपण्यासारखं नाही. माझ्यासारखीनं सिनेमात काही मिळालं तर बघायला हवं – रीटेक घ्यायची सोय असते, मध्ये आरामही करता येणं शक्य असेल ….." आता सीमाताईंची खात्री पटली. त्यांना – आणि सर्वांनाच – शंका होती कि माईंबद्दल जे बोललं जातं ते त्यांच्या कानापर्यंत पोहोचत असावं. खरोखरच त्यांना ते कळत होतं, आणि तेच कारण होतं त्यांनी काम सोडण्याचं. पण सीमाताई बोलून दाखवू शकत नव्हत्या.

"तुम्हालाही माहित आहे माई, तुम्हीही हे अनुभवलं असणारच. एकदा स्टेजवर उभं राहिलं कि असतील नसतील त्या शरीराच्या व्याधी कुठच्या कुठे पळून जातात. स्टेजवर नारळ फुटला, लाईट्स लागले, अगरबत्यांचा सुगंध पसरला कि अंगात ताप आहे का दुखणं, तेही विसरायला होतं……."
सीमाताईंनी असं चित्र उभं केलं कि माईही क्षणभर स्तब्ध झाल्या. मग म्हणाल्या, "मला एक सांगा …..मला हे कळत नाही कि तुम्ही का इतका जोर देताहात कि नाटकात मी परतून यावं? तुमचा काय फायदा त्यात? उलट तुमची भूमिका मी – हडपली, तुम्ही तर खुश व्हायला हवं मी हे काम सोडल्याने. म्हणून स्पष्टच विचारते, हा मला परत बोलावण्याचा दिखावा तुम्ही का करता आहात?"

माईंचा रागाने बोलण्याचा हेतू सफल झाला कारण त्यांचा शेवटचा प्रश्न सीमाताईंना झोंबला असावा असं दिसलं. तरीही त्या तसं न दाखवता क्षणभर गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, "आहे, माझा खूप फायदा आहे," सीमाताई बोलल्या, "आता तुम्ही विचारलत म्हणून मी ही स्पष्टच सांगते – तसं पाहिलं तर आपली नाटकाची दुनिया म्हणजे सावल्यांचा खेळ असतो. मला …. मला तुमच्यात माझ्या भविष्याची पडछाया दिसते.  माझीही आता प्रसिध्दीझोतात फारशी वर्षे शिल्लक राहिली नाहीत. हळू हळु काम – आणि उत्पन्नही कमी होत जात बंद होईल. तुम्ही जो आता धडपड करून स्वतःच्या पायावर उभं राहाण्याचा आत्मसन्मान दाखवत आहात, तो मला डोळ्यात, मनात साठवून ठेवायचा आहे. म्हणजे ….जेव्हा माझी पाळी येईल, तेव्हा मला ह्याच तुमच्या आठवणी असेच प्रयत्न करत राहण्याची हिम्मत देतील, धैर्य देतील. याची जरूरी भासेल मला, आता नाही तर थोड्या वर्षांनी ……"


"नाही, असं म्हणू नका," माई आवाजातला कंप लपवत म्हणाल्या, "माझ्यासारखी परिस्थिती कुणावरही न येवो. माझं नात्यागोत्याचं कुणी नाही – अर्चना आहे, पण खरतर ती माझी कुणी नाही. माझ्या जुन्या शेजार्‍यांची मुलगी. पण पोरीनं इतका लळा लावला कि आईवडिल इथलं घर सोडून नवीन घरात गेले, तर ही चार दिवसातच आपलं सामान बांधून परत आली आणि तेव्हापासून माझ्या घरातच राहिली. सगळे खर्च आपल्या पगाराने चालवीन म्हणते, पण मला नाही ते बरं वाटत. जेव्हा माझी सारी पुंजी संपली तेव्हा – हा पुन्हा काम शोधायचा उपद्व्याप केला. पण तुम्ही का पुढची चिंता करता? तुम्हाला तर स्वतःची  मुलंबाळं आहेत ना?"

"एकच मुलगी आहे. लग्न होऊन परदेशात स्थायिक आहे. ती सांभाळेलही. पण मला ते नकोय. म्हणजे – जावयाचे उपकार कशाला घ्या, असं काही नाही. मुलगी असो वा मुलगा, जमेल तितकं आत्मनिर्भर राहाणंच पसंत करीन. पुढे नाईलाजाने पूर्ण अवलंबून राहावच लागलं तर काही करता येत नाही. पण जितकं होईल तितकं ….. म्हणून तुमच्याकडून हे शिकायचं आहे. तेव्हा तुम्ही परत येणार आहात !"

सीमाताईंनी जेव्हा निशांतला 'माई परत येणार' हे सांगितलं, तेव्हा त्याला हसावं का रडावं ते कळेना. "तुम्ही का त्यांना भरीस पाडून बोलावून घेतलत? चांगल्या गेल्या होत्या स्वतःहूनच. आता तुमचीच भूमिका जाईल…." तो वैतागून म्हणाला.
"माझी भूमिका हा माझा प्रश्न आहे ना? आणि तुला खरंच वाटतं कि त्या स्वतःहून गेल्या होत्या?" सीमाताईंनी टोकदार प्रश्न विचारला. त्याचं सरळ उत्तर न देता निशांत पुट्पुटला, "पण आता सगळंच पुन्हा …." निशांतला त्याच्या तालमींमध्ये, प्रयोगांमध्ये अस्थिरता नको होती. माईंविषयीच्या नाराजीने अर्धेअधिक कलाकार मनमोकळा अभिनय करत नव्ह्ते, असं त्याचं मत होतं. पण सीमाताईंचं म्हणणं पडलं कि इतरांनीही सामावून घ्यायला शिकायला हवं. कोणा एकाचा किंवा एका गटाचा हेका चालवून घेणं हेही बरोबर नाही ना?

तेव्हा काही न सुचून निशांत म्हणाला, "पण माईंनीही समजून वागायला पाहिजे ना? कधी त्या त्यांच्या पध्द्तीच्या अभिनयावर जातात. असा काहीतरी मेलोड्रामा करून माझ्या नाटकाचा विचका करतील ……"
"अरे मग तू दिग्दर्शक कोणत्या कामाचा?" सीमाताईंनी त्याची थट्टा केली, पण मग गंभीर होत म्हणाल्या, "खरं सांग, तुला असं खरंच वाटतं कि त्या, त्यांचा अभिनय तुझ्या नाटकाचा बेरंग करतील?" निशांत गप्प राहिला.

धुसफुस झाली, चिडचिड झाली, पण कुठेतरी सगळ्यांना आपल्या तुसड्या वागण्याच्या जाणीवेची शरमही वाटली असावी. माईही बदलल्या होत्या. आता त्या आपलेपणाच्या उमाळ्याने सर्वांशी प्रत्येक बाबतीत बोलत राहण्याचा उत्साह दाखवत नव्ह्त्या. निशांत बोलावेल तेव्हा, सांगेल तसं नि तेवढंच काम करीत आणि पुन्हा आपल्या कोपर्‍यात काही पुस्तक वाचत बसत. त्यामुळे कोणाला फारश्या तक्रारीला जागा राहिली नव्ह्ती.


पहिल्या प्रयोगाचा दिवस आला. सगळ्यांसाठीच ती तणावाची वेळ होती. पण खास करून माईंसाठी. सीमाताईही आल्या होत्या. प्रयोगासाठी त्या सर्वांनाच – आणि माईंना – भेटायला, शुभेच्छा द्यायला रंगपटात गेल्या. इतक्या नाटकांचे प्रथम प्रयोग केलेल्या माईंसाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती कि त्यांना प्रोत्साहनाची गरज असावी. परंतु मध्यंतरी बराच खंड पडल्यानंतर त्यांची ही पुन्हा नव्याने सुरूवात होती. सीमाताईंनी माईंचे हात हातात घेऊन काही न बोलता नुसते थोपटले, माईंसारख्या मुरलेल्या अभिनेत्रीला त्या काय बोलणार?

प्रथम प्रयोग पार पडला – नुसता पार नाही पडला, तर अत्युत्तम रित्या संपन्न झाला. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी थिएटर डोक्यावर घेतलं. कुमुदिनीबाईंच्या अभिनयाला विशेष प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्या अभिवादनासाठी पडद्या बाहेर आल्या तेव्हा सर्वांनी उभं राहून त्यांना मान दिला.

माई थकून रंगपटात येऊन बसल्या. सगळेच आनंदात एकमेकांना टाळ्या देऊन, पाठीवर थाप मारून वाहवा करत होते. निशांत माईंसमोर आला. त्यांच्या समोर गुडघ्यावर बसून त्याने हात जोडले. "काय बोलू माई? शब्द नाहीत. गाजवलत तुम्ही!" दोघेही आपापल्या डोळ्यांतले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होते.
"अरे बाबा, तुझ्या अपेक्षेत मी उणी तर पडले नाही ना? मला तीच चिंता होती." माई थरथरत्या आवाजात म्हणाल्या. "नाही माई, उलट मीच – कधी कामाच्या तापात अधिक उणं बोललो असेन तर माफी मागायला आलो आहे." निशांत बोलला.

स्टेजच्या पाठी, ग्रीन रूममध्ये सर्वत्रच एक जल्लोष चालला होता. या प्रयोगासाठी बरेचसे खास आमंत्रित आले होते. ते आता पाठी येऊन सर्वांचं अभिनंदन करत होते. मिठाई मागवली गेली. सगळी एकच गडबड उडाली होती.
सीमाताई जराश्या दूरच थांबल्या होत्या, आपल्या परिचितांशी बोलत होत्या. गर्दी ओसरल्यावर त्या ग्रीनरूममध्ये गेल्या. सगळी मंडळी बाजूच्या खोलीत पार्टी करण्यात गुंतली होती. ग्रीनरूममध्ये माई एकट्याच एका कोपर्‍यात डोळे मिटून बसल्या होत्या. चेहरा श्रांत दिसत होता, पण त्यावर एक समाधानही होतं. सीमाताईंच्या चाहुलीने त्यांनी डोळे उघडले.

"माई, मी तुम्हाला काय बोलणार?" त्यांचा हात हाती घेत सीमाताई म्हणाल्या, "अप्रतिम होता तुमचा अभिनय!"
"तुम्ही जोर दिला नसता तर शक्य झालं नसतं," माईंनीही लगेच पोच दिली, "तेवढ्यानेही झाले नाही, पुढची दारेही उघडली," सीमाताईंचा प्रश्नार्थक चेहरा बघून त्यांनी खुलासा केला, "आमंत्रितांमध्ये जीवन सामंत होता. माझ्याबरोबर नायकाचं काम करणार्‍्या शरद सामंतांचा मुलगा, आता सिनेमा दिग्दर्शक आहे म्हणे. इथे मला भेटायला येऊन त्याच्या पुढच्या दोन चित्रपटात काम देऊ केलं. उद्या येऊन करार करणार आहे. मी माझ्या दमानं, तब्येतीनं काम करू शकेन आणि रोजीरोटीही मिळेल. बाई, मला अपेक्षा नव्ह्ती ते मिळालं आणि ते तुमच्यामुळे. ही भूमिका नेहमी तुमचीच होती, आता तुम्हीच करा. निशांतने गळ घातली कि एवढी मेहनत घेतलीय तुम्ही तर निदान पाच प्रयोग तरी करा. म्हणून तेवढे करीन. त्यानंतर संपूर्णतः तुम्हीच……"

"मला बाहेरगावचे प्रयोग ठीक आहेत, सिनेमाचं काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत तुम्हीच …." पण सीमाताईंचं वाक्य माईंनी पूर्ण करू दिलं नाही. "नाही. ठरलं ते ठरलं. पाहा, आपण भविष्याची चिंता करत होतो, पण तुम्ही हट्टानं मला परत घेऊन गेलात, आता माझ्या भविष्याची काळ्जी थोडी तरी मिटली. तुम्ही हे जे निरपेक्षपणे केलंत, माझी खात्री आहे – तुमच्याही पुढच्या काळात कुठल्याही सावल्या नाही भेडसावणार तुम्हाला ……."
सीमाताई काही बोलू शकल्या नाहीत, त्यांनी फक्त मान डोलावली. दाटल्या कंठाने दोघी हात धरून निःशब्द बसून राहिल्या.

                                                                                 समाप्त
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment