Sunday 23 August 2015

पाहुणी









पाहुणी

"हाय एव्हरीवन!" त्यांचा सगळा ग्रुप बसला होता आणि कुशलाने येऊन थोड्या उत्साहानेच घोषणा केली, "एक न्यूज आहे! माझी ना कझीन येतेय यूएसएहून. ती आहे आपल्याच वयाची, पण तिचं सगळंच आयुष्य तिथे गेलं ना, त्यामुळे आपल्या कल्चरची . . .संस्कृतीची फारशी ओळखही नाही. म्हणून तिच्या समर व्हेकेशन मध्ये तिला इथे पाठवत आहेत. आणि ती जबाबदारी टाकलीय माझ्यावर – म्हणजे बहुतेक वेळ ती आपल्याबरोबरच असेल. म्हणजे . . .चालेल ना?" कुशलाने सर्वांवरून नजर फिरवत विचारले.

बहुतेक सर्वांनी खांदे उडवले. "आपल्याला काय हरकत असणार बुवा?  जोपर्यंत तिला उचलून सगळीकडे न्याव लागत नाही तोवर आपलं काय जातयं?" बंकीमने सर्वांचं मत प्रकट केलं. "आपल्याला काही प्रोब्लेम नाही, पण तिला इथे कुठल्या कल्चरल गोष्टी मिळणार आहेत? म्हणजे, आपण आता – काय म्हणतात ते- अगदी पारंपरिक थोडीच आहोत?" निकीने खरी ती गोष्ट दर्शवून दिली. "अरे, काही ना काही छोटे मोठे फंक्शन्स असतातच," तिसर्‍या कुणी मदतीची सूचना मांडली, "अमेरिकेपेक्षा तर जास्तच 'कल्चर' मिळेल इथे, हो ना?"

सर्वांच्या बोलण्याकडे कुशलाचं अर्धवटच लक्ष होतं. तिला जयची प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता अधिक होती. सर्वांकडे बघतांना तिने ओझरता कटाक्ष जयकडे टाकला. त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट नाराजी होती. तिचं लक्ष जाताच त्याने नाक मुरडून दाखवले. त्याची नाराजी बघून कुशला मनात थोडी सुखावली. कुशलाबरोबरचा वेळ इतर कुणात विभागून देण्याची त्याची इच्छा नव्हती, असाच का त्याच्या प्रतिक्रियेचा अर्थ?

त्यांचा ग्रुप अगदी ज्युनिअर कॉलेजपासून एकत्र होता. आता वेगवेगळ्या दिशांना पांगण्याची वेळ आली होती. कुणी पुढच्या उच्च शिक्षणासाठी तर कुणी जॉब ट्रेनिंगसाठी. ज्यांना नोकरी करायची होती त्या बहुतेकांना कॅम्पस इन्टरव्ह्यू मध्येच जॉब मिळाले होते. त्यामुळे सर्वांच्या नवजीवनाची सुरूवात साधारण एकदमच होणार होती. मध्यंतरात हा जेमेतेम एक दीड महिना त्यांना स्वतःसाठी मोकळा मिळाला होता. सर्वांनाच पूर्ण कल्पना होती कि एकदा का सगळे आपापल्या चक्रात अडकले कि पुन्हा पूर्वीसारखे अड्डा जमवून गप्पा मारणे, मूव्हीजना जाणे, शॉपिंग किंवा वाढदिवसाच्या पार्ट्या करणे सहज शक्य होणार नव्हते. म्हणून प्रत्येकजण मिळणार्‍्या एकएक क्षणाची मौज घ्यायला बघत होता.

थोड्या वेळाने जय सहजच आल्यासारखा कुशलाच्या बाजूला येऊन बसला. "काय हे कुशल," तो हळू आवाजात पण नाराजीने म्हणाला, "मी विचार करत होतो, हा थोडाच जेवढा वेळ मिळेल तेवढाच. आणि तुला हाच वेळ मिळाला का कुणालातरी बेबी सिट करण्यासाठी बरोबर घेऊन फिरायला?"

कुशलाच्या अंतरंगात कुठेतरी काही तरी हुरहुरलं. वरकरणी शांतपणे ती म्हणाली, "अरे, मी तरी काय करणार? तिचे आईवडिल तिला सुट्टीसाठी एकटीला पाठवून देत आहेत. माझ्या मम्मीपप्पांना त्यांच्या नोकर्‍या आहेत. ते सर्वच आले असते तर मम्मीपपांनी सुट्टी घेतली असती, पण हिच्या एकटीसाठी…..आणि मी सध्या पूर्ण मोकळी आहे. पुन्हा, ती आहे ही आपल्याच वयाची, मोठ्यांबरोबर बोअर होईल. तेव्हा आपल्याबरोबरच……"
"ते सगळं खरं ग, पण….." जय खरोखरच हिरमुसला दिसत होता, "पण माझ्या सगळ्या प्रोग्रॅम्स नि प्लान्सवर पाणी फिरलं ना…." त्याचे एवढे शब्दही तिच्यासाठी खूप होते.

त्यांच्या ग्रुपमध्ये सगळेच एकमेकांचे चांगले दोस्त होते. पण तिच्यासाठी जय खास होता आणि बरेचदा तिला वाटे कि त्याच्यासाठीही तीच खास मैत्रिण होती. जसजसे शेवटचे वर्ष संपत आले तसे त्या दोघांचे डोळे एकमेकांशी जास्त बोलू लागले. आणि आता तर हा महिना दीड महिन्याचाच काळ त्यांच्या हाती होता. कदाचित चारपाच वर्षांची मैत्री या कालावधीत पुढची पायरी गाठेल …..निदान दोघांच्या नजरा तरी तेच बोलत होत्या.

आणि आता जयने तर प्रत्यक्ष तसं बोलूनही दाखवलं . न जाणे काय प्लान आखले होते त्याने? या विनयालाही आताच यायला हवं होतं का? ती मनात चुटपुटली. पण पुन्हा स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न केला. हा मोलाचा वेळ हातचा सुटून जात होता, कबूल. पण त्यानंतरही ते दोघे अजिबातच भेटू शकणार नाही असं तर नव्हतं. हां, आताच्या सारखा आरामाचा वेळ नंतर मिळणार नव्हता, सतत दुसर्‍या दिवशी ऑफिसला जायचं टेन्शन असणार हे कबूल, पण भेटीगाठी तर जरूर होतीलच – हेच समाधान तिने मानून घेतलं.

समज आल्यानंतर तशी पहिल्यांदाच कुशला विनयाला भेटत होती. तिला आवडली विनी. दिसायला तर गोड होतीच पण वागण्यातही कुठे 'मी अमेरिकन' असा बडेजाव नव्हता. विनी आल्यानंतर कुशलाच्या मम्मीने घरीच दोन दिवस तिची सरबराई केली. तोपर्यंत तिचा जेट लॅगही बराच कमी झाला. त्यानंतर्च कुशला तिला सर्वांना भेटायला घेऊन गेली.
ग्रुपने तिचं स्वागत तर अगदी मनापासून केलं – आणि त्याचं कारण तिने सर्वांसाठी आणलेली चॉकलेट्स नव्हती हेही कुशलाला नक्की ठाऊक होतं. ती त्यांच्यात कुणी बाहेरची आहे असं ग्रुपने तिला अजिबात एकटं पडू दिलं नाही. विनीलाही आपण अमेरिकेत जन्मलो, वाढलो याचा जराही वरचढ भाव नव्हता. तिच्या भाषांनी सर्वांचीच करमणूक होत होती.  तिचे अमेरिकन उच्चार ऐकण्यासाठी सगळे मुद्दाम तिला इंग्लिश बोलायला सांगत. तिचं मराठी तर त्याहूनही गंमतशीर होतं आणि ती ही खुलेपणाने हसे नि चुका सुधारायला सांगे. कुशलाला जरा हुश्श्य वाटलं. तिला थोडीशी चिंता होती कि विनी जर का अगदीच पाश्चात्य मेम निघाली किंवा तिच्या दोस्तांनीही जर का, हे काय लोढणं बरोबर बाळगायचं असा पवित्रा घेतला तर सगळच अवघड झालं असतं. पण आता हे ठीक होतं.

पूर्ण गँगने मिळून आधी तिच्यावर खास भारतीय अन्नपदार्थांचे संस्कार करण्यापासून सुरूवात केली. वडापाव, तिखट भेळपुरी, पाणीपुरी यांनी पहिल्याच दिवशी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा काढल्या. पण ती ही सारं एन्जॉय करत होती. मग पारंपारिक का सांस्कृतिक काय म्हणतात त्या नावाखाली काय दाखवावे यावर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. सर्वांचीच गती त्या दिशेला जरा कमीच होती. मग काहीच नाही, तर देवळं दाखवू या अशी टूम निघाली. सर्वांसाठीच ही एक मजाच होती.

बंकीमचा मोठा भाऊ नवीन घरात राहायला जाणार होता, तेव्हा त्या घराची वास्तूपूजा होती. एरवी हे सगळे फक्त संध्याकाळी पार्टी करायला गेले असते. पण आता सगळेच सांस्कृतिक धारांमध्ये अगदी पूर्ण न्हाऊन निघाले होते. पोरींचा उत्साह विनीला ट्रॅडिशनल पध्दतीने सजवण्यातच जास्त होता.

देवळात गेले असतांना, ह्या गृहपूजेच्या वेळीही, जय स्वतःहून विनीला बर्‍याचश्या गोष्टी समजावून सांगत होता. अरे वा! जयला धर्म पुराणाच्याही इतक्या गोष्टी ठाऊक आहेत की काय, या विचाराने कुशलाला कौतुक वाटलं. बाकीचे त्याच्या स्पष्टीकरणाची मस्करी करू लागले तशी जय म्हणाला, "एकतर नुसतं पाहून तिला काहीच कळणार नाही. सर्व पाश्चात्यांप्रमाणे विनीही हा कसला जादूटोण्यांचा देश, असच समजेल. आणि तुम्ही कोणी काहीतरी विचित्रच समजावून देण्यापेक्षा मीच तुमच्यात बरा!"
विनीला ही सगळ्यात बराच इंटरेस्ट वाटत होता; ती त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारत होती, खुलासे मागत होती.

तोवर गणपतीचे दिवस आले. जयच्या घरी दरवर्षी गौरी-गणपती येत असल्याने त्याने विनीला रोज घरी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले.
"अरे जय, सार्वजनिक गणपतीही कितीतरी असतात की," कुशला जरा अवघडून त्याला म्हणाली, "विनीला बघायला मिळेल सगळीकडेच. त्यासाठी तुझ्या घरी आणि ते सुध्दा रोज कशाला बोलावायला हवे? म्हणजे….अरे, माझ्या पाहुण्यांचं तुझ्या घरच्यांना कशाला ओझं?"
"तू तरी कमालच करतेस हं," जय तिला म्हणाला, "अग, गणपतीत आमच्या घरी इतक्या नातेवाईक आणि मित्रमंडळीचं येणंजाणं होत असतं की त्यात एका माणसाचं ओझं होणार आहे का? आणि सार्वजनिक गणपती बघेल ग ती, पण घरातले पूजापाठ, नैवेद्य, प्रसाद या गोष्टी बघायला मिळणार आहेत का? आमच्या घरी गणपतीबरोबर गौरीही बसतात, ती आरास वगैरेही तिला पाहायला मिळेल. आणि हो, तिची रोजची येण्या-जाण्याची चिंता तू करू नकोस. मी रोज बाईकवरून तिला घेऊन जाईन आणि सुखरूप आणून सोडीन, मग तर झालं?"

आता तर कुशला अस्वस्थच झाली. जयने विनीकडे जास्त लक्ष देणं तिला जरा खटकलंच होतं. पण ती आपली बहीण आहे त्यासाठी जय खास मदत करतोय, हे सर्व तो तिलाच खुश करण्यासाठी करतोय अशीच तिने आपली समजूत घातली. पण आता हे रोजच स्वतःच्या घरी येण्याचं आमंत्रण आणि ते सुध्दा तिला वगळून एकट्या विनीला…..? बाईकबरून रोज विनीला नेलं-आणलं तर कुशलाचा सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, नाही का?...... हे काय होतं होते ते कुशलाला समजतच नव्हतं.

गणपतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे त्यांचा सगळाचं ग्रुप जयच्या घरी गेला. दुसर्‍या दिवशी कुशलाला आशा वाटली कि बाईकचं तो विसरून गेला असेल. जर त्याने फोन करून विनीच्या आमंत्रणाची आठवण करून दिली, तर आपणच तिला घेऊन जाऊ. आपण बरोबर असलो म्हणजे त्यालाही आठवण राहील कि मुळात त्याची मैत्रीण कोण आहे ते.
ती असा विचार करेपर्यंत पाहाते तर विनी बाहेर जाण्यासाठी तयार होऊन बसलेली. कुशलाने विचारल्यावर विनीने सांगितले कि जयने तिला फोन करून अकरा वाजता तयार राहायला सांगितले नि तो खाली पोहोचल्यावर पुन्हा मिस कॉल देणार होता.
कुशलाने वरकरणी हसण्याचा प्रयत्न केला पण आतून खचून गेल्यासारखी झाली. आता तिला वळसा घालून थेट विनीशीच संपर्क? जय आपल्याला आता ओळखतो तरी का, असा काही तरी वेड्यासारखा प्रश्न तिच्या मनात उभरला.

जय वरती घरापर्यंतसुध्दा नाही आला, खालूनच विनीला बोलावून घेऊन गेला. कानामागून आली नि तिखट झाली ……कुशलाला विनीचा राग आला. का हिला आताच यायचं होतं इथे? आधी तर फक्त सुट्टी गेली याची हळहळ होती. पण आता तर विनी तिच्या जयलाच तिच्यापासून दूर घेऊन जात होती. ही कोण होती त्या दोघांच्या मध्ये येणारी? – कुशला मनात चरफडली. रडकुंडीला आली होती. किती खुशीत होती ती – शिक्षण चांगल्याप्रकारे पूर्ण झालं होतं, छानशी नोकरी हातात होती, तिचा मनपसंत इतल्या वर्षांचा मित्र जय तिला आयुष्याची जोडीदारीण होण्याचा प्रश्न विचारणारच होता याची तिला खात्री होती….. या सर्व गुलाबी चित्रात अचानक वरून काळा ढग उतरावा तशी बाहुलीसारखी गोड विनी येऊन टपकली होती.

उशीत तोंड खुपसून कुशलाने अश्रूंना मोकळी वाट करून दिली. बरं तर बरं घरी कुणी नव्हतं. मम्मीपप्पा ऑफिसला आणि धाकटा कुणाल कॉलेजात गेला होता. विनी गेल्यावर तिने आसवांनी मन मोकळं करून घेतलं. पण घरी कुणी असतं तर बरं झालं असतं, असं रडून तिने आपलं मन दुखावून घेतलं नसतं.

एकटी आढ्याकडे पहात पडल्या पडल्या विचार करत राहिली. विनीचं आणि जयचं वागणं पुन्हा पुन्हा आठवत राहिली. विनीला दोष देता येण्यासारखा नव्हता, ती सर्वांशीच सारखं वागत होती. कितीही आठवून पाहिलं तरी विनी जयबरोबर खास जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती असं वागणं काही तिला आठवेना.
तसं पाहिलं तर ….. जयसुध्दा काही अगदी गळेपडूपणा करत होता असही नाही. हा केवळ योगायोग असू शकतो कि त्याच्याकडे विनीला शिकवण्यासारख्या बर्‍याच गोष्टी होत्या, तसच गौरी गणपतीही त्याच्याच घरी येत होते, बाकी कुणाकडेही नाही. केवळ कुशलाचा त्रास वाचवण्यासाठीही कदाचित त्याने विनीला नेण्याचे आणि आणून सोडण्याचे काम स्वतःवर घेतले असेल. काय समजावं हेच तिला कळत नव्हतं.

कितीही डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपत नसते – असंच काहीसं होत होते. विनी तर केवळ मैत्रीनेच वागत होती आणि जयला टोकायला कुशला काय त्याची लग्नाची बायको थोडीच होती? आपला कडवटपणा दाखवून, तोंड वाकडे करून काय साध्य होणार होते? तिचे स्वतःचेच दुःख वाढले असते. आपले विचार आपल्यापाशीच ठेवून कुशला सर्वसाधारणपणेच वागत राहिली.

आता मित्रमंडळातील सर्वांनाच नव्या नोकर्‍यांवर रुजू व्हायचे वेध लागले होते. त्यासाठी ड्रेसेसची खरेदी तर जरूरीच होती. विनीलाही परत घेऊन जाण्यासाठी खास इंडियन ड्रेसेस हवे होते. तिच्या खरेदीत कुशला मुद्दामच जरा बाजूला राहिली. आणि तिच्या अंदाजाप्रमाणे जयने पुढाकार घेऊन विनीला मदत केली.

नोकरीच्या घाण्याला जुंपण्याआधी एकवार शेवटची ट्रिप म्हणून आणि विनीसाठी म्हणूनही सगळ्यांनी एलेफंटा केव्हज् जायचं ठरवलं. कुशलाच्या मनाची स्थिती पहिल्यासारखी राहिली नव्हती. पण नाही म्हणणे विचित्रच दिसेल यासाठी ती काही बोलली नाही.
मोटार लाँचमध्ये चढतांना आणि घारापुरीला उतरवून घेतांना जयने दोन्ही हातांनी विनीला आधार दिला. कितीही दुर्लक्ष करायचे ठरविले तरीही या गोष्टी आपोआपच कुशलाच्या नजरेत खुपत राहिल्या. लेण्यांकडे जातांना थोडा चढणीचा रस्ता होता, तिथे कुशलाचा पाय लचकला नि मुरगळला पण त्याबद्दल ती कुणाला काही बोलली नाही. आता मनःस्थितीच अशी झाली होती कि कुणाकडे काही बोलायची इच्छाच होत नव्हती.

ती हळूहळू सर्वांच्या पाठी चालत राहिली. कुणी विचारलंच, तर, पूर्वी सगळं बघितलय, पुन्हा काय बघायचय…असं काहीतरी गुळमुळीत उत्तर देऊन टाळत राहिली. ती लेण्यांच्या आत गेली नाही. बाहेरूनच पुढच्या मोकळ्या जागेत आणि लेण्यांमध्ये फिरणार्‍या आपल्या मित्रमैत्रिणींना पाहात राहिली. एक बर्फासारखी थंड शिरशिरी मणक्यांतून वर सरसरत जावी तशी तिला जाणीव झाली की फिरतांना जय आणि विनीचे हात एकमेकांत गुंफले होते --- कुशलाने क्षणभर डोळे मिटून घेतले.

त्यानंतर कुशलाने आपली नवीन नोकरी, पहिल्यांदाच ऑफिसात जाण्याची तयारी या सर्वात स्वतःला गुंतवून घेतलं. विनीच्या परतण्याचा दिवस जवळ येत होता. ती मम्मीबरोबर जवळच्या नातेवाईकांना भेटून येण्याचं काम उरकून घेत होती.
शेवटचे तीन-चार दिवस विनी बरीच गप्प गप्प वाटत होती. कदाचित परत जायच्या विचाराने असेल, असं समजून कुशलाने जास्त काही विचारले नाही. या शेवटच्या दोन-तीन दिवसात जय जास्तीत जास्त वेळा विनीला भेटायला येईल असे कुशलाला वाटले होते. पण त्याचा कुठे पत्ता नव्हता. अर्थात फोनवरून सतत विनीशी बोलतही असेल, तिला थोडीच हे कळणार होते? कुशला शक्यतो हे विचार टाळण्याचा प्रयत्न करत होती.

शेवटच्या दिवशी विनी गप्प गप्पच होती. रात्री तिची जायची वेळ झाली. सगळी फॅमिली तिला सोडायला जायला निघतच होती. तेव्हा विनीने कुशलाला एका बाजूला खेचले आणि दबल्या स्वरात म्हणाली, "माझं एक काम करशील? जयला जरा समजावशील?"
कुशलाने गोंधळून प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं. "तुला… माहीत नसेल कुशला….." विनी अडखळत म्हणाली, "लास्ट वीकमध्ये….जयने मला…..प्रपोज केलं. मी…मी…मला अशी काही कल्पनाच नव्हती कि तो ……त्याच्या मनात असं काही असेल. मला…..माझा तिकडे ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे. मी….इथे कुणाला बोलले नाही….माझी मम्मी म्हणाली होती कि ह्या गोष्टी …..इथे कुणाला आवडणार नाहीत म्हणून. मी जयला सगळं सांगितलं. त्याला वाईट वाटलं असेल. तू ही जरा समजावशील….?"

कुशलाला हसावं का रडावं ते कळेना. जयने विनीला प्रपोज करणं हे तसे अपेक्षितच होते. पण विनीच्या उत्तराने सगळंच कसं उलट पुलट झालं होतं. कुशला नि जयच्या खास दोस्तीबद्दल काहीच कल्पना नसलेली विनया उलट तिलाच विनवत होती कि जयला समजाव कि विनी कुणा दुसर्‍याला शब्द देऊन चुकलीय.

"पण….पण विनी," कुशला काहीतरी आठवून बोलली, "जयला…..किंवा कोणालाच ही कल्पना येणं शक्य नव्हतं कि तुझा बॉयफ्रेंड असेल. तू….तुझं वागणं ….म्हणजे, तू जयबरोबर हातात हात गुंफूनही फिरत होतीस. तेव्हा त्याची अशी समजूत झाल्यास काय नवल?"
"अं?....ओह्….. त्याने….तोच माझा हात धरायचा," विनीने घाईघाईने स्पष्टीकरण दिले, "मी….मला नव्हतं माहीत कि त्याचा काही स्पेशल अर्थ होईल. फ्रेंडस् फ्रेंडस् हात पकडतात ना….?" ती खरंच गोंधळली होती.

"चला पोरींनो….झालं कि नाही तुमचं हितगुज?" कुशलाच्या मम्मीने आवाज दिला तेव्हा त्या दोघींना निघावे लागले. कुशलाने विनीच्या खांद्यावर थोपटून सर्व सांभाळून घ्यायचं आश्वासन दिलं.
"जयने मला, कुणाला सांगू नको म्हणून सांगितलं….तेव्हा तू त्याला सरळ सरळ विचारू किंवा समजावू नकोस हां…." विनीने निघता निघता तिला बजावले.  "कळलं, मी सांभाळेन सगळं," कुशला म्हणाली.

तिच्या अपेक्षेप्रमाणे दोन-तीन दिवसांनंतर जयचा फोन आला – कुठे भेटायचं ते ठरवण्यासाठी. त्याच दिवशी नवीन ऑफिस जॉईन केलय, तेव्हा वेळ होणार नाही असं सांगून तिने टाळलं.
रात्रभर विचार करत राहिली….कारणं सांगून ती त्याला किती दिवस टाळू शकणार होती? का भेटून काय ते नक्की करावं? पण काय निर्णय घेणार? तो काय बोलणार, विचारणार याची तिला पूर्ण खात्री होती. आता निर्णय सर्वस्वी तिच्यावरच अवलंबून होता. पुढचं पाऊल काय उचलायचं हे तिलाच ठरवायचं होतं.

ती खुश होती का? खरंतर आनंद व्हायला हवा होता तिला. विनीचं घाबरवू पहाणारं सावट आता दूर झालं होतं. विनी स्वतःच्या रिलेशनशिपमध्ये पूर्णतः कमिटेड होती त्यामुळे दूर राहूनही जय सोबत निखळ मैत्रीखेरीज अन्य काही संबंध ठेवेल अशी शक्यताही नव्हती. मग आता तर जय सर्वस्वी कुशलाचाच होता …. अगदी पहिल्यासारखाच. तर ही खुशीचीच गोष्ट नव्हती का?

मध्यंतरी काही झालंच नाही असं भासवून मागल्या पानावरून पुढे चालू, …… का……? विनी आल्यावर ज्या वेगाने आणि पूर्णपणाने तो कुशलाला विसरला होता, तेच पुन्हा दुसरी कुणी मुलगी आयुष्यात आल्यावरही होणं सहज शक्य होते. आतापर्यंत त्या दोघांनी एकमेकांना काहीच वचनं दिली घेतली नव्हती, तोवरच हे वर्तन पहायला मिळालं म्हणून निदान तिला भविष्याचा अंदाज तरी आला होता. तर मग हे उमगल्यानंतरही कळून सवरून त्याच मुलाबरोबर भविष्याची स्वप्ने रंगवायची?

पण कदाचित ही केवळ एक चुकून घडलेली घटना असू शकते. ती त्याला इतकी वर्षे ओळखत होती. ग्रुपमध्ये इतर मुली होत्या, कॉलेजातही खूप होत्या. पण कधी त्याच्या वागण्यात अस्थिरपणा दिसला नव्हता. केवळ विनीच्या बाबतीत …… का तिच्या जोडीला एक अधिक आकर्षण होतं, अमेरिकेला जाण्याचं? का तो खरोखरच सिरियसली गुंतला होता विनीमध्ये? विसरू शकेल विनीला? काय बरोबर काय चूक हे तिला कळेनासं झालं होतं ---

पण एकदा जे झालं होतं ते तिने प्रत्यक्ष पाहिले होते. ती असतांनाच, तिच्या समोर झाले होते. ती पुढ्यात नसतांना, पुन्हा केव्हा काय होईल, त्याचे वागणे कोणाबरोबर कसे असेल हे ती कधी विश्वासाने, खात्रीपूर्वक सांगू शकेल? म्हणजे पूर्ण आयुष्यच असं संशयाच्या, अविश्वासाच्या जाळ्यात स्वतःही गुरफटणार आणि त्यालाही त्यात ओढणार. हे असं भविष्य?
कुशलाच्या मनाचा निर्णय ठरला.

समाप्त
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment